शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी १५ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करा
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी १५ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करा
मुंबई :
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत सन २०२४-२५ आणि २०२५-२६ या दोन वर्षांसाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्कारांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, पात्र खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक आणि संबंधित व्यक्तींनी १५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन क्रीडा विभागामार्फत करण्यात आले आहे.
राज्यातील उत्कृष्ट क्रीडापटू तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने गौरविण्यात येते. यामध्ये क्रीडा क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तींसाठी जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, महिला क्रीडा मार्गदर्शकांसाठी जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार, खेळाडूंसाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, तसेच साहसी उपक्रम आणि दिव्यांग खेळाडूंसाठीच्या पुरस्कारांचा समावेश आहे.
शासनाच्या २९ डिसेंबर २०२३ आणि २५ जानेवारी २०२४ रोजीच्या निर्णयानुसार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची सुधारित नियमावली, २०२३ निश्चित करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार १२ ऑक्टोबर २०२६ पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पात्र इच्छुकांनी क्रीडा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन विहित नमुन्यात ऑनलाइन अर्ज सादर करावेत. १५ नोव्हेंबर २०२६ ही अर्ज करण्याची अंतिम मुदत असून, त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे पात्र खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक आणि संबंधित व्यक्तींनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.