सिंधुदुर्गात वित्तीय समावेशन अभियानाचे नियोजन; ३१ डिसेंबरपर्यंत पात्र नागरिकांना योजनांचा लाभ देण्याचे उद्दिष्ट

0
7
सिंधुदुर्गात वित्तीय समावेशन अभियानाचे नियोजन; ३१ डिसेंबरपर्यंत पात्र नागरिकांना योजनांचा लाभ देण्याचे उद्दिष्ट
सिंधुदुर्गात वित्तीय समावेशन अभियानाचे नियोजन; ३१ डिसेंबरपर्यंत पात्र नागरिकांना योजनांचा लाभ देण्याचे उद्दिष्ट

सिंधुदुर्गात वित्तीय समावेशन अभियानाचे नियोजन; ३१ डिसेंबरपर्यंत पात्र नागरिकांना योजनांचा लाभ देण्याचे उद्दिष्ट

सिंधुदुर्ग :
केंद्र शासनाच्या वित्तीय सेवा विभागामार्फत २१ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या वित्तीय समावेशन योजनांच्या संतृप्ती अभियानाच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय सल्लागार समितीची (DLCC) विशेष बैठक आयोजित करण्यात आली. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रातील सर्व पात्र नागरिकांपर्यंत वित्तीय योजनांचे लाभ पोहोचविण्यासाठी या बैठकीत कृती आराखड्यावर चर्चा करण्यात आली.
अग्रणी जिल्हा व्यवस्थापक ऋषिकेश गावडे यांच्या पुढाकाराने आयोजित या बैठकीच्या अध्यक्षस्थानी निवासी जिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे होते. यावेळी ग्रामपंचायत विभागाचे प्रमुख शिरसाट, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक उदय पाटील, एनआरएलएमचे निलेश वालावलकर, नाबार्डच्या दीपाली माळी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले, विविध बँकांचे समन्वयक आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जनधन, विमा आणि पेन्शन योजनांच्या प्रसारावर भर
बैठकीत प्रधानमंत्री जनधन योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना यांचा लाभ अधिकाधिक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्याबाबत चर्चा झाली. यासोबतच डिजिटल बँकिंग सुविधा आणि वित्तीय साक्षरता उपक्रमांचा व्यापक प्रसार करण्यावर भर देण्यात आला.
गावागावांत विशेष बँकिंग शिबिरे
अभियानांतर्गत प्रत्येक गावात विशेष बँकिंग शिबिरे आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून नवीन बँक खाती उघडणे, आधार संलग्नता पूर्ण करणे, मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे आणि सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये नागरिकांची नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच सुरक्षित डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठीही विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
प्रशासन आणि बँकांचा संयुक्त पुढाकार
वित्तीय समावेशन अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन, बँका, ग्रामपंचायत विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नाबार्ड, एनआरएलएम आणि अन्य संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त केला.
या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना बँकिंग सेवा आणि सामाजिक सुरक्षा योजनांशी जोडणे, वित्तीय साक्षरता वाढविणे आणि पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here