शिष्यवृत्ती परीक्षेत दापोलीची आद्या गोरीवले तालुक्यात प्रथम
शिष्यवृत्ती परीक्षेत दापोलीची आद्या गोरीवले तालुक्यात प्रथम; महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाकडून गौरव!
दापोली प्रतिनिधी : अरविंद मांडवकर
दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा साखळोली क्र. १ येथील इयत्ता चौथीची विद्यार्थिनी कु. आद्या विनोद गोरीवले हिने प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत २६२ गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशाच्या जोरावर तिने रत्नागिरी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत द्वितीय क्रमांक, तर दापोली तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या गुणवंत यशाबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने दापोली येथे आयोजित गुणगौरव सोहळ्यात तिचा सन्मान करण्यात आला.
दापोली येथील श्री मंगल कार्यालयात विद्यार्थी, शिक्षक आणि शाळांच्या गुणवंत कामगिरीचा गौरव करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष अजय गराटे यांच्या हस्ते आद्या गोरीवले हिचा गौरव करण्यात आला. आद्याने आपली आई वैभवी गोरीवले आणि मार्गदर्शक शिक्षिका संगीता लोहारे यांच्यासमवेत हा सन्मान स्वीकारला.
प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत २६२ गुण मिळवत जिल्हास्तरावर द्वितीय आणि तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवणे ही आद्या हिच्या जिद्द, मेहनत आणि अभ्यासातील सातत्याची पावती आहे. तिच्या या यशामागे आईचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शक शिक्षिकेचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आद्याच्या यशामुळे साखळोली शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेला नवी ओळख मिळाली आहे.
या गुणगौरव सोहळ्याला तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, शिक्षकवृंद, गुणवंत विद्यार्थी, सन्मानमूर्ती आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष संदीप जालगावकर आणि त्यांच्या कार्यकारिणीने केलेल्या नेटके नियोजनामुळे हा सोहळा उत्साहात संपन्न झाला.
आद्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.