रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि GTUIC यांच्यात सामंजस्य करार

0
9
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि GTUIC यांच्यात सामंजस्य करार
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि GTUIC यांच्यात सामंजस्य करार

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि GTUIC यांच्यात सामंजस्य करार

मुंबई :
राज्यातील तरुणांच्या नवकल्पनांना प्रोत्साहन देऊन त्यांना उद्योजकतेच्या क्षेत्रात योग्य दिशा देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर (MACCIA) अंतर्गत कार्यरत गाव तिथे उद्योजक इनक्यूबेशन कौन्सिल (GTUIC) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
राज्यातील तळागाळातील नवकल्पनांना प्रोत्साहन देणे आणि ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’च्या माध्यमातून सामाजिक समस्यांवर तंत्रज्ञानाधारित प्रभावी उपाय शोधण्यासाठी अधिकाधिक स्पर्धकांना सहभागी करून घेणे, हा या कराराचा मुख्य उद्देश आहे. या सहकार्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना, नवउद्योजकांना आणि स्टार्टअप्सना आपल्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मार्गदर्शन व तांत्रिक मदत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, राज्यातील तरुणांमध्ये अनेक नाविन्यपूर्ण कल्पना आहेत. या कल्पनांना योग्य दिशा देऊन त्यांचे व्यावसायिक स्वरूपात रूपांतर करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागांतील गुणवंत तरुणांना उद्योगजगताशी जोडून त्यांना उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्यावर या उपक्रमात भर दिला जाणार आहे.
या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील महाविद्यालये, विद्यापीठे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) आणि पॉलिटेक्निकमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात येणार आहे. निवडक नवोन्मेषक आणि स्टार्टअप्सना तज्ज्ञांचे मार्गदर्शन, तांत्रिक साहाय्य आणि योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. रोजगार शोधणाऱ्या तरुणांसोबतच रोजगारनिर्मिती करणारे उद्योजक घडविणे, हाही या उपक्रमाचा महत्त्वाचा हेतू आहे
गाव तिथे उद्योजक इनक्यूबेशन कौन्सिलचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी ग्रामीण भागातील युवक, महिला आणि स्थानिक कारागिरांकडे व्यवसाय सुरू करण्याची क्षमता व कल्पना असल्या, तरी योग्य मार्गदर्शन, भांडवल, तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि शासकीय योजनांची माहिती उपलब्ध नसल्यामुळे अनेक अडचणी येतात, असे नमूद केले. या अडचणी दूर करण्यासाठी संस्था गावपातळीपासून जिल्हा आणि राज्यस्तरापर्यंत उद्योजकतेला चालना देण्याचे काम करणार आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने उद्योगविषयक मार्गदर्शन आणि रोजगारनिर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत
या सामंजस्य करारावर कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर आणि GTUIC चे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी विविध अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here