‘मन की बात’मध्ये शबरी नॅचरल्सचा गौरव; महाराष्ट्राच्या आदिवासी उत्पादनांना राष्ट्रीय स्तरावर ओळख
‘मन की बात’मध्ये शबरी नॅचरल्सचा गौरव; महाराष्ट्राच्या आदिवासी उत्पादनांना राष्ट्रीय स्तरावर ओळख
मुंबई :
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’च्या १३९ व्या भागात महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत विकसित करण्यात आलेल्या ‘शबरी नॅचरल्स’ या ब्रँडचा विशेष उल्लेख केला. आदिवासी संस्कृती, पारंपरिक कला आणि स्थानिक उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे.
शबरी नॅचरल्सच्या उत्पादनांच्या वैशिष्ट्यपूर्ण पॅकेजिंगला ‘इंडिया डिझाईन मार्क’ आणि जपानचा प्रतिष्ठित ‘गुड डिझाईन अवॉर्ड’ प्राप्त झाला आहे. वारली, गोंड आणि चित्रकथी यांसारख्या पारंपरिक कला शैलींचे प्रतिबिंब या पॅकेजिंगमध्ये उमटले असून, त्यातून महाराष्ट्राच्या आदिवासी सांस्कृतिक वारशाला व्यापक ओळख मिळत आहे.
या ब्रँडच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या नैसर्गिक, हस्तकला आणि कृषी उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जात आहे. ई-कॉमर्स, मोबाइल ॲप्लिकेशन आणि कॉर्पोरेट गिफ्टिंगच्या माध्यमातून ही उत्पादने अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आदिवासी कारागीर, शेतकरी आणि महिला बचत गटांसाठी रोजगार व उत्पन्नाच्या नव्या संधी निर्माण होण्यास मदत होत आहे.
‘मन की बात’मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या उपक्रमाचा उल्लेख केल्याने आदिवासी समाजाच्या कला, परंपरा आणि कौशल्यांना राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म आणि कॉर्पोरेट गिफ्टिंगच्या माध्यमातून आदिवासी उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळेल, असा विश्वास आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी व्यक्त केला.
शबरी नॅचरल्सच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या दर्जेदार उत्पादनांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांनी सांगितले. प्रधानमंत्री यांनी या उपक्रमाची दखल घेतल्याबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला. तसेच आदिवासी संस्कृती आणि उत्पादनांचा अधिकाधिक प्रसार करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.