महापे येथे ‘इंडिया ज्वेलरी पार्क’ प्रकल्पाचा शुभारंभ; २५ हजार कोटींची गुंतवणूक, एक लाख रोजगारांची अपेक्षा

0
6
महापे येथे ‘इंडिया ज्वेलरी पार्क’ प्रकल्पाचा शुभारंभ; २५ हजार कोटींची गुंतवणूक, एक लाख रोजगारांची अपेक्षा
महापे येथे ‘इंडिया ज्वेलरी पार्क’ प्रकल्पाचा शुभारंभ; २५ हजार कोटींची गुंतवणूक, एक लाख रोजगारांची अपेक्षा

महापे येथे ‘इंडिया ज्वेलरी पार्क’ प्रकल्पाचा शुभारंभ; २५ हजार कोटींची गुंतवणूक, एक लाख रोजगारांची अपेक्षा

नवी मुंबई :
नवी मुंबईतील महापे येथील टीटीसी औद्योगिक क्षेत्रात ‘इंडिया ज्वेलरी पार्क, मुंबई’ प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. महाराष्ट्राला जागतिक स्तरावरील दागिने उत्पादन आणि निर्यातीचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री गणेश नाईक, आमदार मंदाताई म्हात्रे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बलगन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र कुशवाह आणि रत्न व आभूषण निर्यात प्रोत्साहन परिषदेचे अध्यक्ष किरीट भन्साळी उपस्थित होते.
महापे येथील २२ एकर क्षेत्रावर अत्याधुनिक दागिने उत्पादन केंद्र विकसित करण्यात येत आहे. महाराष्ट्राची व्यावसायिक क्षमता, कुशल मनुष्यबळ, सुरक्षित औद्योगिक वातावरण आणि उद्योजकतेची परंपरा यांच्या बळावर राज्याला जागतिक दागिने उद्योगात मोठी संधी उपलब्ध होऊ शकते, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. बदलत्या जागतिक व्यापार परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादनातील नावीन्य आणि निर्यातीच्या नव्या संधींचा स्वीकार करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रकल्पासाठी आवश्यक वीज, पाणी, रस्ते आणि अन्य पायाभूत सुविधा तसेच विविध विभागांच्या परवानग्या वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या २०४७ पर्यंत विकसित भारत घडविण्याच्या संकल्पपूर्तीत उत्पादन, निर्यात, रोजगारनिर्मिती आणि उद्योजकतेची भूमिका महत्त्वाची असून, इंडिया ज्वेलरी पार्कसारखे प्रकल्प महाराष्ट्राला एक ट्रिलियन अमेरिकी डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योगदान देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पातून सुमारे २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित होण्याची आणि एक लाख रोजगारांच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. या परिसरात दोन हजारांहून अधिक उत्पादन युनिट्स सामावून घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे रत्न व आभूषण उद्योगाशी संबंधित उत्पादन आणि निर्यात क्षेत्राला चालना मिळण्याची शक्यता आहे.
राज्याच्या जेम्स अँड ज्वेलरी धोरणांतर्गत एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करणे, पाच लाख रोजगार निर्माण करणे आणि निर्यात दुप्पट करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय सहकार्य उपलब्ध करून देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी रत्न व आभूषण निर्यात प्रोत्साहन परिषदेचे अध्यक्ष किरीट भन्साळी यांनी प्रकल्पाची पार्श्वभूमी आणि दागिने उद्योगाच्या विकासातील त्याचे महत्त्व स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here