पनवेलमध्ये ‘नैना’ विकासकामांचा शुभारंभ; विमानतळ कनेक्टिव्हिटी प्रकल्पांसह उरण बाह्य वळण मार्गाचे लोकार्पण

0
9
पनवेलमध्ये ‘नैना’ विकासकामांचा शुभारंभ; विमानतळ कनेक्टिव्हिटी प्रकल्पांसह उरण बाह्य वळण मार्गाचे लोकार्पण
पनवेलमध्ये ‘नैना’ विकासकामांचा शुभारंभ; विमानतळ कनेक्टिव्हिटी प्रकल्पांसह उरण बाह्य वळण मार्गाचे लोकार्पण

पनवेलमध्ये ‘नैना’ विकासकामांचा शुभारंभ; विमानतळ कनेक्टिव्हिटी प्रकल्पांसह उरण बाह्य वळण मार्गाचे लोकार्पण

पनवेल :
पनवेल येथील ‘नैना’ (नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र) परिसरातील विविध विकासकामांचा शुभारंभ, जमीनधारकांना मालमत्ता पत्रकांचे वितरण, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचे लोकार्पण तसेच उरण बाह्य वळण मार्गाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्रीमंडळातील सदस्य, लोकप्रतिनिधी आणि भूमिपुत्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने परिसराच्या विकासात मोलाचे योगदान देणारे लोकनेते दि. बा. पाटील यांना अभिवादन करण्यात आले. नवी मुंबईसह रायगड जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी आणि भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी अजित पवार यांनी सातत्याने प्रयत्न केले, असे यावेळी नमूद करण्यात आले.
‘तिसरी मुंबई’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नैना प्रकल्पांतर्गत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील सुमारे ३७१ चौरस किलोमीटर क्षेत्रात सुनियोजित शहरी विकास, आधुनिक पायाभूत सुविधा आणि जागतिक दर्जाच्या नागरी सोयी-सुविधा विकसित करण्याचे नियोजन आहे. अनियंत्रित बांधकामाला आळा घालून नियोजनबद्ध विकास साधणे हा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे.
SBR-९, BR-४ आणि BR-५ हे पूल, उरण बाह्य वळण मार्ग तसेच नांदगाव परिसरातील ३६ आणि ४५ मीटर रुंदीच्या रस्त्यांच्या विकासकामांमुळे या भागातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पांमुळे नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होण्याबरोबरच नवी मुंबई, पनवेल, उरण आणि रायगड जिल्ह्यातील विकासालाही गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
विकास प्रक्रियेत स्थानिक नागरिकांना सहभागी करून त्यांच्या हिताला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. जमीनधारकांना मालमत्ता पत्रकांचे वितरण हा त्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. भूमिपुत्रांच्या सहभागातून उद्योग, व्यापार, सेवा क्षेत्र, पर्यटन आणि रोजगाराच्या नव्या संधी स्थानिकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
नैना परिसरासह नवी मुंबई, पनवेल, उरण आणि रायगड जिल्ह्याच्या विकासाला या प्रकल्पांमुळे अधिक गती मिळेल आणि हा परिसर महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचे नवे ‘ग्रोथ इंजिन’ ठरेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here