पनवेलमधील गिरवले येथे अवैध गॅस साठवणुकीवर छापा; १३६ सिलेंडरसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त

0
9
पनवेलमधील गिरवले येथे अवैध गॅस साठवणुकीवर छापा; १३६ सिलेंडरसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त
पनवेलमधील गिरवले येथे अवैध गॅस साठवणुकीवर छापा; १३६ सिलेंडरसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त

पनवेलमधील गिरवले येथे अवैध गॅस साठवणुकीवर छापा; १३६ सिलेंडरसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त

पनवेल :
रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील गिरवले येथे अवैधरीत्या गॅस सिलेंडर साठवून ठेवल्याप्रकरणी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने मोठी कारवाई केली. या कारवाईत विविध कंपन्यांचे एकूण १३६ गॅस सिलेंडर, एक टेम्पो आणि एक मोटार असा अंदाजे १० लाख २ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे छापा
२७ ऑक्टोबर २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपनियंत्रक शिधावाटप गणेश बेल्लाळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरीय दक्षता पथकाने गिरवले येथे छापा टाकला. या वेळी भरलेले आणि रिकामे असे एकूण १३६ गॅस सिलेंडर अवैधरीत्या साठवून ठेवल्याचे आढळून आले.
भरलेले आणि रिकामे मिळून १३६ सिलेंडर जप्त
जप्त करण्यात आलेल्या सिलेंडरमध्ये १९ किलो वजनाचे १४ आणि १५ किलो वजनाचे ४ भरलेले सिलेंडर आहेत. तसेच १९ किलो वजनाचे ४, १५ किलो वजनाचे ११२ आणि ५ किलो वजनाचे २ रिकामे सिलेंडर जप्त करण्यात आले. या सिलेंडरसोबत वाहतुकीसाठी वापरला जाणारा एक टेम्पो आणि एक मोटारही पथकाने ताब्यात घेतली. जप्त केलेल्या संपूर्ण मुद्देमालाची अंदाजे किंमत १० लाख २ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
दक्षता पथकाची संयुक्त कारवाई
ही कारवाई सहायक नियंत्रक शिधावाटप प्रदीप काळे, मुख्य निरीक्षण अधिकारी नागनाथ हंगरगे, पनवेल निरीक्षण अधिकारी अश्विनी धनवे, शिधावाटप निरीक्षक रामराजे भोसले, चंद्रकांत कांबळे, अरुण काते, राजेश सोरते, देवानंद थोरवे, रवींद्र राठोड आणि पवन कुंभले यांनी केली.
अवैध गॅस साठवणुकीच्या या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here