वेंगुर्ल्यात मुंबई विद्यापीठाचे मरीन स्टडीज केंद्र उभारणार

0
7
वेंगुर्ल्यात मुंबई विद्यापीठाचे मरीन स्टडीज केंद्र उभारणार
वेंगुर्ल्यात मुंबई विद्यापीठाचे मरीन स्टडीज केंद्र उभारणार

वेंगुर्ल्यात मुंबई विद्यापीठाचे मरीन स्टडीज केंद्र उभारणार

सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या नव्या संधी

वेंगुर्ला :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सागरी विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात उच्च दर्जाचे शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे मरीन स्टडीज केंद्र वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीत स्थापन करण्यात येणार आहे. या केंद्रामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला नवी दिशा मिळण्यासोबतच सागरी अभ्यासाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी रोजगार आणि संशोधनाच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

या केंद्राच्या माध्यमातून सागरी विज्ञान, मत्स्यव्यवसाय, सागरी तंत्रज्ञान आणि संबंधित विषयांमध्ये शिक्षण व संशोधनाच्या व्यापक संधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. कोकण किनारपट्टीला लाभलेली समृद्ध सागरी जैवविविधता आणि मत्स्यसंपत्ती लक्षात घेता हे केंद्र शैक्षणिक तसेच संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
मरीन स्टडीज केंद्राच्या स्थापनेसंदर्भातील प्रशासकीय प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी मंत्रालयात भेट घेऊन सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत चर्चा केली.
या बैठकीत केंद्राच्या उभारणीसंदर्भातील प्रलंबित बाबी, आवश्यक प्रशासकीय कार्यवाही आणि पुढील नियोजन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मरीन स्टडीज केंद्राच्या उभारणीची तयारी तातडीने सुरू करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. तसेच या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
या बैठकीला मत्स्यव्यवसाय आयुक्त भानुदास पालवे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
वेंगुर्ला येथे हे केंद्र सुरू झाल्यानंतर सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणातील विद्यार्थ्यांना सागरी शिक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्थानिक पातळीवरच उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here