संकष्टीच्या मुहूर्तावर देवगड हापूसची पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना
संकष्टीच्या मुहूर्तावर देवगड हापूसची पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना
गिरी रामेश्वर येथील शेतकरी निलेश बानकर यांचा हंगामातील पहिला आंबा मुंबईच्या एपीएमसी बाजारात दाखल होणार; दराकडे कोकणवासीयांचे लक्ष
देवगड :
संकष्टीच्या मुहूर्तावर देवगड हापूस आंब्याच्या हंगामाची चाहूल लागली असून, देवगड तालुक्यातील गिरी रामेश्वर येथील प्रगतशील शेतकरी व बागायतदार निलेश बानकर यांनी आपल्या बागेतील हापूस आंब्याची पहिली पेटी मुंबईतील वाशी एपीएमसी मार्केटला रवाना केली आहे.
गिरी रामेश्वर येथील शेतकरी निलेश बानकर यांचा हंगामातील पहिला आंबा मुंबईच्या एपीएमसी बाजारात
बानकर यांच्या हापूस आंब्याच्या झाडांना यंदा जुलै महिन्यातच मोहर आला होता. त्यानंतर आलेल्या आंब्यांची काढणी करून त्यांनी संकष्टीच्या निमित्ताने पहिली पेटी बाजारपेठेत पाठवली. दिवाळीच्या काळात आणखी सहा ते सात पेट्या पाठविण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
कोकणातील हापूस आंब्याला देशभरात मोठी मागणी असते. हंगामाच्या सुरुवातीलाच देवगड हापूस बाजारपेठेत दाखल होत असल्याने या आंब्याला किती दर मिळतो, याकडे संपूर्ण कोकणवासीयांचे लक्ष लागले आहे. पहिल्या पेटीला मिळणारा दर आगामी हंगामाच्या बाजारभावाबाबत उत्सुकता निर्माण करणारा ठरणार आहे.