कणकवलीत १० डिसेंबरला धनगर समाज महासंघाची सभा; गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार मेळाव्याचे नियोजन
कणकवलीत १० डिसेंबरला धनगर समाज महासंघाची सभा; गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार मेळाव्याचे नियोजन
वैभववाडी प्रतिनिधी :
ऑल इंडिया धनगर समाज महासंघ, जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या वतीने डिसेंबर महिन्यात भव्य धनगर समाज मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या मेळाव्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच समाजप्रबोधन व जनजागृती करण्यात येणार आहे. या मेळाव्याच्या नियोजनासाठी गुरुवार, दि. १० डिसेंबर २०२६ रोजी कणकवली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहात दुपारी २ वाजता जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण सभा आयोजित करण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष प्रवीणजी काकडे यांच्या सूचनेनुसार या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेला ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे राज्य संघटक विजयजी कोकरे तसेच युवक कोकणाचे प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
या सभेत आगामी धनगर समाज मेळाव्याचे नियोजन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, समाजातील विविध प्रश्न तसेच जनजागृती उपक्रमांबाबत चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील युवक पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व धनगर समाज बांधवांनी या सभेला उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विजय खरात यांनी केले आहे.