कोकणातील पहिले नाचणी खरेदी केंद्र वैभववाडीत सुरू होणार
कोकणातील पहिले नाचणी खरेदी केंद्र वैभववाडीत सुरू होणार; प्रतिक्विंटल ५,२०५ रुपये हमीभाव, शेतकऱ्यांना २४ तासांत पैसे
वैभववाडी प्रतिनिधी :
कोकणातील पहिले नाचणी खरेदी केंद्र वैभववाडी तालुका खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहे. या केंद्रावर शासनाच्या आधारभूत किंमत योजनेनुसार नाचणीची प्रतिक्विंटल ५,२०५ रुपये दराने खरेदी केली जाणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून या केंद्राला मंजुरी मिळाली असून, यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाचणी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. शेतकऱ्यांनी नाचणी आणि भात पिकाची ई-पीक नोंदणी ११ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैभववाडी तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन तथा जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे यांनी केले.
वैभववाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संघाचे सचिव सिद्धेश रावराणे उपस्थित होते. प्रमोद रावराणे म्हणाले की, वैभववाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात नाचणीचे उत्पादन घेतले जाते. नाचणी उत्पादक शेतकऱ्यांना शासनाच्या आधारभूत किमतीचा लाभ मिळावा आणि त्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारभाव मिळावा, यासाठी तालुक्यात नाचणी खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीसाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, आता शेतकऱ्यांना प्रतिकिलो ५२ रुपये ५ पैसे म्हणजेच प्रतिक्विंटल ५,२०५ रुपये दर मिळणार आहे. विशेष म्हणजे, नाचणी विक्री केल्यानंतर अवघ्या २४ तासांत विक्रीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नाचणी उत्पादक शेतकऱ्यांना या केंद्रावर आपली नाचणी विक्री करता येणार आहे.
या खरेदी प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी नाचणी व भात पिकाची ई-पीक नोंदणी ११ नोव्हेंबरपर्यंत करणे बंधनकारक आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही वैभववाडी तालुका खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून वैभववाडी आणि करूळ येथे भात खरेदी केली जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी संघाकडे ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी आधार कार्ड, फार्मर आयडी, सातबारा उतारा, पीकपाणी नोंद, बँक पासबुक आणि आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक ही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.
भात आणि नाचणी खरेदीबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी संघाचे सर्व संचालक २ ते ४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत तालुक्यातील विविध गावांना भेटी देणार आहेत. यावेळी विकास संस्था आणि ग्रामपंचायतींना भेट देऊन शासनाच्या खरेदी प्रक्रियेची माहिती शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. शासनाने यंदा भातासाठी प्रतिक्विंटल २,४४१ रुपये, तर नाचणीसाठी प्रतिक्विंटल ५,२०५ रुपये हमीभाव निश्चित केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाच्या या खरेदी योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन रावराणे यांनी केले.
शासनाच्या हमीभावापेक्षा कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना भात विक्री करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. शासनाच्या निर्धारित हमीभावापेक्षा कमी दराने भात खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात रीतसर तक्रार प्राप्त झाल्यास नियमानुसार कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येतील. तसेच शासनाची आवश्यक परवानगी घेतल्याशिवाय खासगी व्यापाऱ्यांना थेट शेतकऱ्यांकडून भात खरेदी करता येणार नाही. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही रावराणे यांनी दिला.
प्रत्येक हेक्टरसाठी युरियाची एक बॅग
शेतकऱ्यांना खत उपलब्धतेबाबत माहिती देताना रावराणे यांनी सांगितले की, यापुढे प्रत्येक हेक्टरसाठी युरियाची एक बॅग उपलब्ध करून दिली जाणार आहे. मात्र, यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी आधी मागणी नोंदवणे आवश्यक आहे. मागणी नोंदवल्यानंतरच युरियाची बॅग उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच तालुक्यातील १३ सहकारी संस्थांकडे खत खरेदी-विक्रीचे परवाने असून, अन्य संस्थांनाही हे परवाने मिळावेत यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.