शिक्षक भरती २०२६ : पवित्र पोर्टलवर गुणवत्ता यादी जाहीर; १०,३२८ पदांसाठी ११,४९३ उमेदवारांची शिफारस
शिक्षक भरती २०२६ : पवित्र पोर्टलवर गुणवत्ता यादी जाहीर; १०,३२८ पदांसाठी ११,४९३ उमेदवारांची शिफारस
राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला आता वेग आला असून, पवित्र पोर्टलमार्फत खासगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक पदभरतीसाठी नियमित फेरीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे हजारो उमेदवारांचे लक्ष आता मुलाखत आणि नियुक्ती प्रक्रियेकडे लागले आहे.
मुंबई, दि. १ :
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT)-२०२५ अंतर्गत खासगी शैक्षणिक संस्थांमधील १० हजार ३२८ रिक्त शिक्षक पदांसाठी तब्बल ११ हजार ४९३ उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्य प्रक्रियेसाठी शिफारस करण्यात आली आहे. या उमेदवारांच्या २७ हजार १५४ प्राधान्यक्रमांचा समावेश असलेली नियमित फेरीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह आणि राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
मुलाखतीसह निवड प्रक्रियेसाठी खासगी शैक्षणिक संस्थांकडून एकूण २ हजार ४१६ जाहिराती प्राप्त झाल्या होत्या. पदनिहाय शिफारशींमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीच्या १ हजार ६०९ रिक्त पदांसाठी ४ हजार ४७८, इयत्ता सहावी ते आठवीच्या ४ हजार ५०५ पदांसाठी १० हजार ७९२, तर इयत्ता नववी ते दहावीच्या ४ हजार २१४ पदांसाठी ११ हजार ८८४ प्राधान्यक्रमांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमधील शिक्षण सेवक व शिक्षक पदभरतीसाठी TAIT-२०२५ ही ऑनलाइन परीक्षा २७ मे ते ५ जून २०२५ या कालावधीत घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी २ लाख २८ हजार ८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख ११ हजार ३०८ उमेदवारांनी परीक्षा दिली, तर १ लाख ७० हजार १०८ उमेदवारांनी स्व-प्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण केली आहे.
पवित्र पोर्टलवर १ मे ते २० जुलै २०२६ या कालावधीत मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह अशा दोन्ही प्रकारच्या भरतीसाठी जाहिराती प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर पात्र उमेदवारांकडून ६ ते १६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत प्राधान्यक्रम नोंदवून घेण्यात आले. मुलाखतीसह निवड प्रक्रियेसाठी एकूण १ लाख ३१ हजार ५०५ उमेदवारांनी प्राधान्यक्रम निश्चित केले होते.
शिफारस झालेल्या उमेदवारांना तसेच संबंधित शैक्षणिक व्यवस्थापनांना एसएमएसद्वारे माहिती दिली जात आहे. उमेदवारांना पवित्र पोर्टल येथे लॉगिन करून निवडीची स्थिती तपासता येणार आहे. तसेच व्यवस्थापननिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी संकेतस्थळावरील ‘Download’ विभागात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दरम्यान, शालेय शिक्षण विभागाने नियुक्ती प्राधिकाऱ्यांना २ एप्रिल २०२६ च्या शासन निर्णयातील तरतुदींनुसार ३ ते २५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत उमेदवारांच्या मुलाखती व अध्यापन कौशल्य चाचणीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे शिफारस झालेल्या उमेदवारांनी पुढील प्रक्रियेसाठी संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुलाखतीशिवाय निवड प्रक्रियेतील तक्रारींच्या निवारणासाठी राज्यस्तरावर तक्रार निवारण व दुरुस्ती समिती स्थापन करण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांनी आपल्या तक्रारी विहित नमुन्यात [email protected] या ई-मेलवर ७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.