रत्नागिरीत दक्षता जनजागृती सप्ताह उत्साहात; भ्रष्टाचारविरोधी उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा गौरव

0
8
रत्नागिरीत दक्षता जनजागृती सप्ताह उत्साहात; भ्रष्टाचारविरोधी उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा गौरव
रत्नागिरीत दक्षता जनजागृती सप्ताह उत्साहात; भ्रष्टाचारविरोधी उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा गौरव

रत्नागिरीत दक्षता जनजागृती सप्ताह उत्साहात; भ्रष्टाचारविरोधी उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा गौरव

रत्नागिरी :
भ्रष्टाचारमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यात ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या सप्ताहानिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रबोधनपर व्याख्याने, निबंध स्पर्धा, वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा तसेच पथनाट्यांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत जनजागृती करण्यात आली. विविध स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रके देऊन गौरव करण्यात आला.

दापोलीत पोलीस पाटील व नागरिकांना मार्गदर्शन
दापोली तहसीलदार कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित कार्यक्रमात पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांनी उपस्थित पोलीस पाटील आणि नागरिकांना भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी तहसीलदार कार्यालयाच्या दर्शनी भागात भ्रष्टाचारविरोधी जनजागृती करणारी भित्तीपत्रके लावण्यात आली. उपस्थितांना माहितीपत्रकांचे वाटपही करण्यात आले. त्यानंतर दापोली बसस्थानक येथे प्रवासी आणि नागरिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कामकाजाची माहिती देणारी पत्रके वितरित करून जागृती करण्यात आली.
शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन
विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा, नैतिक मूल्ये आणि भ्रष्टाचारविरोधी विचार रुजविण्यासाठी जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रके देऊन गौरविण्यात आले.
सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालयातही निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रके प्रदान करण्यात आली. रत्नागिरी येथील श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयात वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धांमधील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला.
याशिवाय रत्नागिरी एसटी बसस्थानक आणि मंगळवार आठवडा बाजार येथे भ्रष्टाचारविरोधी जनजागृतीपर पथनाट्ये सादर करण्यात आली. या पथनाट्यांद्वारे नागरिकांना भ्रष्टाचाराचे दुष्परिणाम आणि त्याविरोधात जागरूक राहण्याचा संदेश देण्यात आला. पथनाट्य सादर करणाऱ्या कलावंत विद्यार्थ्यांनाही प्रशस्तीपत्रके देऊन गौरविण्यात आले.
‘ज्ञानाबरोबर नैतिक मूल्ये जोपासली तरच तुम्ही खरे पदवीधर’
श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयातील बक्षीस वितरण समारंभात मार्गदर्शन करताना पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शिक्षणातून मिळवलेल्या ज्ञानाबरोबरच दैनंदिन जीवनात आणि भविष्यातील व्यावसायिक कारकिर्दीत नैतिक मूल्यांचा प्रत्यक्ष वापर करणे आवश्यक आहे. असे केल्यासच ते समाजाचे खरे पदवीधर ठरतील. केवळ शैक्षणिक पात्रता मिळविणे पुरेसे नसून प्रामाणिकपणा आणि नैतिक जबाबदारी जपणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य बर्वे यांनीही आपले मनोगत व्यक्त करत भ्रष्टाचारमुक्त समाजाच्या निर्मितीमध्ये तरुणांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.
विविध माध्यमांतून भ्रष्टाचारविरोधी संदेश
दक्षता जनजागृती सप्ताहादरम्यान स्थानिक वृत्तपत्रे, केबल टीव्ही, आकाशवाणी तसेच व्हॉट्सॲप आणि विविध सोशल मीडिया माध्यमांचा प्रभावी वापर करून भ्रष्टाचारविरोधी संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले. वृत्तपत्रांसोबत जनजागृती पत्रकांचे वितरण करून नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराविरोधात निर्भयपणे पुढे यावे आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here