रत्नागिरीत ४ नोव्हेंबरला ‘विकसित भारत युवा संसद २०२६’
रत्नागिरीत ४ नोव्हेंबरला ‘विकसित भारत युवा संसद २०२६’
‘एक देश, एक निवडणूक’ विषयावर होणार वैचारिक मंथन
रत्नागिरी :
युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या ‘विकसित भारत २०४७’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत माय भारत, रत्नागिरी यांच्या वतीने बुधवार, ४ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘विकसित भारत युवा संसद २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी नोडल जिल्हास्तरीय हा कार्यक्रम फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी (FAMT) येथे सकाळी १० वाजता होणार आहे.
राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाचे हे नवे स्वरूप असून देशातील तरुणांना एकत्र आणणे, त्यांच्यामध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण करणे आणि राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना सक्षम करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यंदाच्या युवा संसदेसाठी ‘एक देश, एक निवडणूक’ (One Nation, One Election) हा महत्त्वपूर्ण विषय निश्चित करण्यात आला आहे. या विषयावर तरुणांना आपले विचार मांडण्याची आणि विविध दृष्टिकोनांतून वैचारिक मंथन करण्याची संधी मिळणार आहे.
या युवा संसदेत १८ ते २५ वयोगटातील तरुण-तरुणींना सहभागी होता येणार आहे. वयाची पात्रता निश्चित करण्यासाठी १७ ऑगस्ट २०२६ ही तारीख ग्राह्य धरली जाणार आहे. तसेच, यापूर्वी राष्ट्रीय स्तरावरील युवा संसदेच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या स्पर्धकांना या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांनी अधिकृत गुगल फॉर्म भरून नोंदणी पूर्ण करावी. कार्यक्रमासंदर्भातील अधिक माहिती आणि नोंदणीसाठी केंद्र सरकारच्या mybharat.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अधिकाधिक युवक-युवतींनी या वैचारिक व्यासपीठात सहभागी होऊन आपले विचार मांडावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.