फोंडाघाट महाविद्यालयात मराठी विभागाच्या भित्तिपत्रिकेचे उत्साहात प्रकाशन; विद्यार्थ्यांच्या साहित्यिक अभिरुचीला प्रोत्साहन

0
8
फोंडाघाट महाविद्यालयात मराठी विभागाच्या भित्तिपत्रिकेचे उत्साहात प्रकाशन; विद्यार्थ्यांच्या साहित्यिक अभिरुचीला प्रोत्साहन
फोंडाघाट महाविद्यालयात मराठी विभागाच्या भित्तिपत्रिकेचे उत्साहात प्रकाशन; विद्यार्थ्यांच्या साहित्यिक अभिरुचीला प्रोत्साहन

फोंडाघाट महाविद्यालयात मराठी विभागाच्या भित्तिपत्रिकेचे उत्साहात प्रकाशन; विद्यार्थ्यांच्या साहित्यिक अभिरुचीला प्रोत्साहन

वाचन आणि लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी भित्तिपत्रिका उपयुक्त – प्राचार्य डॉ. पुरंदर नारे

फोंडाघाट :
कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथील मराठी विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या साहित्यिक अभिरुचीला आणि सर्जनशील लेखनाला प्रोत्साहन देण्यासाठी भित्तिपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंदर नारे यांच्या हस्ते या भित्तिपत्रिकेचे उत्साहात प्रकाशन झाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. सतीश कामत यांनी भित्तिपत्रिका प्रकाशनामागील भूमिका आणि उद्देश स्पष्ट केला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्याबरोबरच त्यांचे लेखनकौशल्य, चिकित्सक दृष्टी आणि साहित्यिक जाणिवा विकसित व्हाव्यात, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी साहित्यातील नामवंत कादंबरीकारांच्या निवडक कादंबऱ्यांचे परीक्षण विद्यार्थ्यांनी केले असून, या परीक्षणांचा समावेश भित्तिपत्रिकेत करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःहून पुढाकार घेत साहित्याचे वाचन, आकलन आणि परीक्षणात्मक लेखन केल्याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून कु. ऋतुजा कदम हिने मनोगत व्यक्त केले. मराठी विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या साहित्यिक उपक्रमांमुळे विविध साहित्यकृतींची ओळख होते. तसेच वाचन, लेखन आणि साहित्याचे समीक्षात्मक आकलन करण्याची आवड निर्माण होते. भित्तिपत्रिकेमुळे विद्यार्थ्यांना आपल्या विचारांना आणि लेखनाला अभिव्यक्तीचे व्यासपीठ मिळाल्याचे समाधान तिने व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. पुरंदर नारे यांनी भित्तिपत्रिकेसाठी लेखन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांमधील लेखनकौशल्य आणि सर्जनशीलतेला अशा उपक्रमांमधून प्रोत्साहन मिळते. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी साहित्य, कला आणि संस्कृती यांचाही अभ्यास करणे आवश्यक आहे. मराठी भाषेतील नामवंत साहित्यिक, लेखक आणि कलावंत यांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, त्यांच्या साहित्यकृतींचे वाचन व्हावे आणि त्यातून साहित्यिक अभिरुची विकसित व्हावी, या दृष्टीने मराठी विभागाचे उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन मराठी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक प्रा. जगदीश राणे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या वाचन, लेखन आणि साहित्यिक अभिव्यक्तीला व्यासपीठ उपलब्ध करून देणारा मराठी विभागाचा हा उपक्रम साहित्यविषयक जाणीव विकसित करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here