चिपळुणात भाजपची ‘राष्ट्रचिंतन बैठक’; ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ अभियानाला प्रतिसाद

0
7
चिपळुणात भाजपची ‘राष्ट्रचिंतन बैठक’; ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ अभियानाला प्रतिसाद
चिपळुणात भाजपची ‘राष्ट्रचिंतन बैठक’; ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ अभियानाला प्रतिसाद

चिपळुणात भाजपची ‘राष्ट्रचिंतन बैठक’; ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ अभियानाला प्रतिसाद

आमदार प्रमोद जठार यांची प्रमुख उपस्थिती; SIR समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम

चिपळूण :
भारतीय जनता पार्टीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ अभियानांतर्गत भाजप रत्नागिरी दक्षिण जिल्ह्याची राष्ट्रचिंतन बैठक मंगळवारी (३ नोव्हेंबर) सायंकाळी चिपळुणातील शिक्षक पतपेढी सभागृहात पार पडली. जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या बैठकीला महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य तथा भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार प्रमोद जठार प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

संपूर्ण वंदे मातरम् आणि महाराष्ट्र गीताने बैठकीची सुरुवात झाली. यावेळी भाजप रत्नागिरी दक्षिण जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या हस्ते आमदार प्रमोद जठार यांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकात प्रशांत यादव यांनी राष्ट्रचिंतन बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करावे, तसेच आगामी काळात बूथस्तरापासून संघटना अधिक सक्षम करण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार प्रमोद जठार यांनी ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ अभियानाचे महत्त्व विशद केले. भाजपची ध्येय-धोरणे, पक्षाची भूमिका आणि विविध उपक्रम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रभावीपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीदरम्यान SIRच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी नवनिर्वाचित चिपळूण शहर मंडळ अध्यक्ष आशिष खातू आणि चिपळूण शहर महिला मोर्चाच्या अध्यक्ष रुही खेडेकर यांचा आमदार प्रमोद जठार व जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या बैठकीला रत्नागिरी दक्षिण जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here