रायगड किल्ला पर्यटन विकास आराखड्याच्या कामांना गती देणार; ३१ व्या बैठकीत पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

0
13
रायगड किल्ला पर्यटन विकास आराखड्याच्या कामांना गती देणार; ३१ व्या बैठकीत पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
रायगड किल्ला पर्यटन विकास आराखड्याच्या कामांना गती देणार; ३१ व्या बैठकीत पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

रायगड किल्ला पर्यटन विकास आराखड्याच्या कामांना गती देणार; ३१ व्या बैठकीत पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

अलिबाग (रायगड) :
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या पवित्र दुर्गराज रायगडाचे संवर्धन आणि विकास हा केवळ शासकीय कामाचा विषय नसून आपल्या अस्मितेचा आणि श्रद्धेचा विषय आहे, असे प्रतिपादन रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी केले. रायगड किल्ला व परिसर पर्यटन विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेली सर्व कामे नियोजनबद्ध पद्धतीने आणि निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.
रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग येथे ‘रायगड किल्ला व परिसर पर्यटन आराखडा प्राधिकरण समिती’ची ३१ वी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत किल्ला आणि परिसरातील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. गडावरील कामांना गती देऊन येथे येणाऱ्या शिवभक्तांना आणि पर्यटकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला.
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या (ASI) मंजूर कामांसह सी-डॅक अंतर्गत प्रकल्प आणि एमआरएसएसीच्या पुढील टप्प्यातील कामे संबंधित विभागांनी समन्वयाने पूर्ण करावीत, असे निर्देश देण्यात आले. संपूर्ण किल्ला परिसर प्लास्टिकमुक्त आणि कचरामुक्त करण्यासाठी कचरा संकलन व विल्हेवाटीची प्रभावी व्यवस्था उभारावी. तसेच स्वच्छतागृहांची कामे पूर्ण करून त्यांचे हस्तांतरण करावे, अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या.
रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी पूर्वनियोजित उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. याशिवाय होळीचा माळ, छत्री परिसर, शिवसृष्टी प्रकल्प तसेच साहित्य व प्रवासी रोपवेच्या प्रस्तावांचा आढावा घेण्यात आला. या प्रकल्पांशी संबंधित प्रलंबित बाबी निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्यावर चर्चा झाली.
किल्ल्याच्या संवर्धन कामांशी संबंधित छायाचित्रे, नकाशे आणि तांत्रिक रेखाचित्रांचे शास्त्रोक्त पद्धतीने जतन करण्यासाठी स्वतंत्र ‘अभिलेख व दस्तऐवजीकरण कक्ष’ स्थापन करण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. शिवतीर्थ रायगडावर येणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताला आणि पर्यटकाला शिवकालीन वैभवाची अनुभूती मिळावी, यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून कामांच्या प्रगतीचा नियमित आढावा घ्यावा आणि विकासकामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत, असे पालकमंत्री गोगावले यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे, सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here