जुन्या मतदार यादीत नाव असूनही प्रारूप यादीत नाव नसल्यास नमुना ६ मध्ये अर्ज करता येणार – निवडणूक आयोग

0
14
जुन्या मतदार यादीत नाव असूनही प्रारूप यादीत नाव नसल्यास नमुना ६ मध्ये अर्ज करता येणार - निवडणूक आयोग
जुन्या मतदार यादीत नाव असूनही प्रारूप यादीत नाव नसल्यास नमुना ६ मध्ये अर्ज करता येणार - निवडणूक आयोग

जुन्या मतदार यादीत नाव असूनही प्रारूप यादीत नाव नसल्यास नमुना ६ मध्ये अर्ज करता येणार – निवडणूक आयोग

मुंबई :
विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेदरम्यान पूर्वीच्या मतदार यादीत नाव असूनही नव्याने प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट नसलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अशा मतदारांना मतदार यादीत पुन्हा नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना क्रमांक ६ (Form 6) भरून अर्ज करता येणार आहे. यापूर्वी मतदार यादीत नाव असतानाही नव्याने नमुना क्रमांक ६ भरल्यामुळे खोटी घोषणा केल्याचा ठपका ठेवला जाणार नाही, असे भारत निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या स्पष्टीकरणानुसार, नमुना क्रमांक ६ मधील घोषणा १ ऑगस्ट २०२२ पासून लागू करण्यात आली आहे. या अर्जामध्ये प्रथमच मतदार यादीत नाव समाविष्ट होत असल्याबाबत घोषणा करावी लागते. त्यामुळे पूर्वी मतदार यादीत नाव असलेल्या काही नागरिकांमध्ये नव्याने अर्ज करताना संभ्रम निर्माण झाला होता.
या पार्श्वभूमीवर आयोगाने स्पष्ट केले आहे की, प्रारूप मतदार यादीत नाव नसलेला कोणताही पात्र नागरिक अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी निर्धारित प्रक्रियेनुसार नमुना क्रमांक ६ भरू शकतो. संबंधित नागरिकाचे नाव यापूर्वीच्या मतदार यादीत होते किंवा नव्हते, याचा अर्ज स्वीकारण्यावर कोणताही परिणाम होणार नाही.
नागरिकांनी आपले नाव प्रारूप मतदार यादीत आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी. नाव नसल्यास आवश्यक कागदपत्रे आणि विहित घोषणापत्रासह नमुना क्रमांक ६ भरून अर्ज सादर करावा. हा अर्ज संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे ऑफलाइन पद्धतीने सादर करता येतो. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत Voters Portal वर ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट होण्यासाठी नागरिकांनी या प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here