महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध उपक्रम; मदरशांमध्ये शैक्षणिक सप्ताहाचे आयोजन
महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध उपक्रम; मदरशांमध्ये शैक्षणिक सप्ताहाचे आयोजन
मुंबई :
थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त त्यांचे समता, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाचे विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राज्यभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली.
या उपक्रमांतर्गत मदरशांमध्ये ‘महात्मा फुले शैक्षणिक सप्ताह’ आयोजित करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांसाठी निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांमध्ये ‘महात्मा फुले ग्रंथ कोपरा’ तयार करण्यात येणार असून, महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांच्या ‘गुलामगिरी’ आणि ‘शेतकऱ्याचा आसूड’ या महत्त्वपूर्ण ग्रंथांचे उर्दू भाषांतरही करण्यात येणार आहे.
महात्मा फुले यांनी आपल्या कार्यातून समाजात समता, शिक्षण आणि स्त्री-पुरुष समानतेचा विचार रुजविला. त्यांचे पुरोगामी, समतावादी आणि परिवर्तनवादी विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांमध्ये सामाजिक जाणीव आणि शैक्षणिक विचारांची रुजवण करण्याचा शासनाचा संकल्प असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी स्पष्ट केले.