दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महावितरण सरसावले; मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ३.६८ कोटींचा धनादेश
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महावितरण सरसावले; मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ३.६८ कोटींचा धनादेश
मुंबई :
राज्यातील दुष्काळग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ३ कोटी ६८ लाख १७ हजार ८८७ रुपयांचे योगदान दिले आहे. या मदतनिधीचा धनादेश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र आणि अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांनी शुक्रवारी (६ नोव्हेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुंबईतील वर्षा निवासस्थानी सुपूर्द केला.
यावेळी ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विक्रम कुमार, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी., तसेच महावितरणचे संचालक धनंजय औंढेकर (संचालन), योगेश गडकरी (वाणिज्य), अनुदीप दिघे (वित्त) आणि राजेंद्र पवार (मानव संसाधन) उपस्थित होते.
राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संकटाचा सामना करीत आहेत. या संकटकाळात दुष्काळग्रस्तांना आधार मिळावा, या उद्देशाने महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने आर्थिक योगदान दिले. वर्ग एकच्या अधिकाऱ्यांपासून ते क्षेत्रीय स्तरावर कार्यरत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनी या मदतकार्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
धनादेश स्वीकारताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणच्या सर्व अधिकारी, कर्मचारी आणि व्यवस्थापनाचे आभार मानले. दुष्काळाच्या कठीण काळात महावितरणने दाखवलेली सामाजिक संवेदनशीलता कौतुकास्पद असून, या मदतीमुळे दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना तत्काळ दिलासा देण्यासाठी मदत होईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. वीजपुरवठ्याची जबाबदारी पार पाडतानाच सामाजिक बांधिलकी जपण्याचे महावितरणचे कार्य या उपक्रमातून अधोरेखित झाले आहे.
हरित ऊर्जेतील महाराष्ट्राच्या कामगिरीचेही कौतुक
दरम्यान, केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय (MNRE) आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (PFC) यांच्या मूल्यांकन अहवालानुसार, ‘रिन्युएबल एनर्जी स्टेट असेसमेंट फ्रेमवर्क’ (RE-SAF) अंतर्गत हरित ऊर्जेची निर्मिती आणि विकास यामध्ये महाराष्ट्राने देशातील राज्यांमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.