जयंत पाटील यांच्यावरील टीकेचा अनंत पिळणकर यांच्याकडून निषेध; निलेश राणेंना इशारा
जयंत पाटील यांच्यावरील टीकेचा अनंत पिळणकर यांच्याकडून निषेध; निलेश राणेंना इशारा
निलेश राणे यांनी केलेल्या आरोपांचे पुरावे जनतेसमोर आणावेत
कणकवली (प्रतिनिधी) :
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान राणे पिता-पुत्रांवर कोणतीही टीका केली नसताना आमदार निलेश राणे यांनी त्यांच्यावर टीका करण्याचे कारण काय, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी उपस्थित केला आहे. ज्येष्ठ नेत्यांवर एकेरी भाषेत टीका करणे अयोग्य असून, निलेश राणे यांच्या वक्तव्याचा आपण निषेध करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
जयंत पाटील हे गेली ४० वर्षे विधानसभेचे सदस्य राहिले असून, त्यांनी राज्याच्या राजकारणात अनेक महत्त्वाची मंत्रिपदे भूषवली आहेत. आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी कधीही पराभव पाहिलेला नाही. २०१९ ते २०२२ या कालावधीत त्यांनी जलसंपदा मंत्री म्हणून काम पाहिले असल्याने पाझर तलाव आणि जलसंधारणाच्या विषयांबाबत त्यांना विशेष आस्था आहे, असे पिळणकर यांनी स्पष्ट केले.
सासोली गावच्या दौऱ्यादरम्यान पिंगुळी येथील ग्रामस्थांनी विनंती केल्यामुळे जयंत पाटील यांनी तेथील पाझर तलावाचीही पाहणी केली होती. मात्र, या संपूर्ण दौऱ्यात त्यांनी आमदार निलेश राणे यांच्याबाबत एकही शब्द काढला नाही किंवा त्यांच्यावर कोणतीही टीका केली नाही. असे असताना निलेश राणे यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका करण्याचे कारण काय, असा प्रश्न पिळणकर यांनी उपस्थित केला.
निलेश राणे यांच्याकडे सांगली विक्री प्रकरणासंदर्भात किंवा साखर कारखान्यांमधील कथित भ्रष्टाचाराबाबत काही पुरावे असतील, तर त्यांनी ते जनतेसमोर आणावेत. सध्या त्यांच्याकडे सत्ता आणि चौकशी यंत्रणा उपलब्ध आहेत. त्यामुळे संबंधित प्रकरणांची चौकशी करण्यास आमची कोणतीही हरकत नाही. मात्र, विनाकारण ज्येष्ठ नेत्यांवर एकेरी भाषेत टीका करणे योग्य नाही, असे पिळणकर म्हणाले.
जयंत पाटील हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते असून आमच्यासाठी आदरणीय आहेत. त्यांची राजकीय आणि सामाजिक संस्कृती वेगळी आहे. कितीही टीका झाली तरी ते आपली संस्कृती सोडून बोलत नाहीत. त्यामुळे त्यांच्याबाबत बोलतानाही सुसंस्कृत भाषेचा वापर अपेक्षित आहे, असे त्यांनी नमूद केले.
आमच्या नेत्यांवर विनाकारण होणारी टीका यापुढे सहन केली जाणार नाही. भविष्यातही अशा प्रकारे टीका झाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध प्रश्न आणि विषयांवर आम्हालाही भूमिका मांडावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी दिला.