ठाणे जिल्ह्यात रॉकेट व हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर दोन महिन्यांची बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

0
7
ठाणे जिल्ह्यात रॉकेट व हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर बंदी; ८ जानेवारी २०२७ पर्यंत आदेश लागू
ठाणे जिल्ह्यात रॉकेट व हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर बंदी; ८ जानेवारी २०२७ पर्यंत आदेश लागू

ठाणे जिल्ह्यात रॉकेट व हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर दोन महिन्यांची बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

९ नोव्हेंबर २०२६ ते ८ जानेवारी २०२७ पर्यंत बंदी लागू; नियम मोडणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई

ठाणे :
ठाणे जिल्ह्यात वाढत्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर रॉकेट आणि तत्सम हवेत उडविणाऱ्या फटाक्यांच्या वापरावर संपूर्ण जिल्ह्याच्या महसुली हद्दीत बंदी घालण्यात आली आहे. ९ नोव्हेंबर २०२६ पासून ८ जानेवारी २०२७ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ही बंदी लागू राहणार आहे. ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी याबाबत आदेश जारी केला आहे.
ठाणे जिल्ह्यात अलीकडच्या काळात विविध ठिकाणी आगीच्या घटना घडल्या असून, त्यामध्ये सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनांमुळे नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. काही नागरिक रॉकेट व हवेत उडणारे फटाके थेट हातात धरून धोकादायक पद्धतीने उडवत असल्याचे निदर्शनास आले आहे.
रहिवासी भाग, दाट लोकवस्ती, इमारतींचे रिफ्यूजी एरिया, वाहनतळ, गच्ची आणि बाल्कनीतून मोठ्या प्रमाणात रॉकेट उडविले जात असल्याने इमारतींना आग लागण्याची शक्यता वाढते. अशा घटनांमुळे जीवित आणि मालमत्तेचे गंभीर नुकसान होऊ शकते. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी हा प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आला आहे.
ही बंदी संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील सार्वजनिक तसेच खासगी जागा, इमारतींच्या गच्च्या, बाल्कनी, आवारे आणि सर्व रहिवासी भागांना लागू राहणार आहे. रॉकेट व तत्सम हवेत उडविणाऱ्या फटाक्यांचा वापर पूर्णपणे प्रतिबंधित करण्यात आला आहे.
आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि अग्निशमन विभागावर सोपविण्यात आली आहे. तसेच गृहनिर्माण संस्थांनी आपल्या सभासदांना या बंदीची माहिती द्यावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ५१ आणि ६० नुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. इतर फटाक्यांचा वापर मात्र प्रचलित कायदे, सक्षम प्राधिकाऱ्यांचे आदेश आणि न्यायालयीन निर्देशांच्या अधीन राहूनच करता येणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here