तारळे उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम फेब्रुवारीअखेर पूर्ण करा; १ मार्चला लोकार्पणाचे नियोजन – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

0
8
तारळे उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम फेब्रुवारीअखेर पूर्ण करा; १ मार्चला लोकार्पणाचे नियोजन – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
तारळे उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम फेब्रुवारीअखेर पूर्ण करा; १ मार्चला लोकार्पणाचे नियोजन – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

तारळे उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम फेब्रुवारीअखेर पूर्ण करा; १ मार्चला लोकार्पणाचे नियोजन – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

तारळे :
राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे येथील नवीन उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम दर्जेदार आणि जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. या रुग्णालयाचे लोकार्पण १ मार्च २०२७ रोजी नियोजित असल्याने बांधकामासह उर्वरित सर्व कामे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस पूर्ण करावीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी तारळे उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी वैद्यकीय अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून बांधकामाची सद्यस्थिती, कामाची प्रगती, गुणवत्ता तसेच रुग्णालयात उपलब्ध होणाऱ्या सुविधांची माहिती घेतली. कामाचा दर्जा राखून नियोजित वेळेत बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
नवीन उपजिल्हा रुग्णालयात ५० खाटांची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामध्ये रुग्णांसाठी स्वतंत्र विभाग, प्रसूतीगृह, अपघात विभाग, हाडांच्या शस्त्रक्रियांसाठी आवश्यक विशेष साहित्य, एक्स-रे, सोनोग्राफी आणि डायलिसिस विभाग अशा आधुनिक वैद्यकीय सुविधांचा समावेश असेल. तसेच आवश्यक मनुष्यबळ, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने, पार्किंग व्यवस्था आणि वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.
तारळे उपजिल्हा रुग्णालयाला आवश्यक असलेल्या सर्व आरोग्यविषयक सेवा व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. हे रुग्णालय अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्याचा प्रयत्न असल्याचे पालकमंत्री आबिटकर यांनी सांगितले. नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षितता आणि आरोग्यसंपन्न राज्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आरोग्य विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी राज्य आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता थोरात, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम. डी. देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रवीण कदम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र शेटे यांच्यासह संबंधित पदाधिकारी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, परिचारिका, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांशी संवाद साधत सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
नवीन रुग्णालयामुळे तारळे आणि परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांना जवळच दर्जेदार व आधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here