रत्नागिरीच्या जॅकप्रो महिला कंपनीच्या दिवाळी फराळाला पश्चिम बंगालमधूनही मागणी
रत्नागिरीच्या जॅकप्रो महिला कंपनीच्या दिवाळी फराळाला पश्चिम बंगालमधूनही मागणी
रत्नागिरी :
कोकणातील महिलांच्या कौशल्याला बाजारपेठ मिळवून देण्याबरोबरच ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने रत्नागिरीतील ‘जॅकप्रो महिला फार्मर प्रोड्युसर कंपनी’ने राबविलेल्या दिवाळी फराळ किट उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. महिलांनी तयार केलेल्या फराळाची चव आणि गुणवत्ता ग्राहकांच्या पसंतीस उतरल्याने मुंबई, पुण्यासह पश्चिम बंगालमधूनही या किटला मागणी आली आहे. त्यामुळे रत्नागिरीतील ग्रामीण महिलांच्या हातगुणांची चर्चा राज्याबाहेरही पोहोचली आहे.
‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी तालुक्यात या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या १० हजार शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याच्या संकल्पनेतून सुरू झालेली ही तालुक्यातील एकमेव कंपनी असून, शेतकरी कुटुंबांतील सुमारे साडेसातशे महिला या कंपनीच्या सभासद आहेत. शेतकरी महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य दर, दर्जा आणि हक्काची बाजारपेठ मिळवून देणे हा कंपनीचा मुख्य उद्देश आहे.
कोकणात आंबा, काजू, फणस, कोकम, करवंद आणि जांभूळ यांसारख्या फळांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. मात्र, ही फळे प्रामुख्याने हंगामी असल्याने फळांचा हंगाम संपल्यानंतर सप्टेंबर ते डिसेंबर या काळात महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी कंपनीने विशेष उपक्रमांचे नियोजन केले. गणेशोत्सव आणि दिवाळीच्या निमित्ताने ‘दिवाळी फराळ किट’ तसेच ‘अभ्यंगस्नान दिवाळी सुगंधी किट’ तयार करण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
फराळ तयार करणे, त्याचे पॅकेजिंग आणि विक्री अशा विविध टप्प्यांमध्ये जवळपास ५० महिलांनी सहभाग घेतला. या माध्यमातून ग्रामीण महिलांना दिवाळीच्या काळात आर्थिक उत्पन्न मिळविण्याची संधी उपलब्ध झाली. महिलांनी तयार केलेल्या फराळाला मुंबई आणि पुण्यातून मिळालेल्या प्रतिसादासोबतच पश्चिम बंगालमधूनही मागणी आल्याने या उपक्रमाला व्यापक बाजारपेठ मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
कंपनीची उत्पादने वर्षभर ग्राहकांना उपलब्ध व्हावीत, यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेजवळील संकेश्वर पार्कमधील शॉप क्रमांक ८ येथे ‘महिला किसान मार्ट’ हे विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रातून ग्राहकांना कंपनीची विविध उत्पादने खरेदी करता येतात.
या उपक्रमासाठी कंपनीच्या अध्यक्षा स्वरा वैभव देसाई, सेक्रेटरी हेमलता केशव गिडये, संचालिका शरयू संदीप देसाई, ज्योती मोरे, समृद्धी सोनार, भक्ती मोरे, रवीना कदम आणि निशिगंधा कोसुम्बकर यांनी पुढाकार घेतला. तसेच कंपनीचे सीईओ सार्थक अजित कदम आणि अकाउंटंट सायली चंद्रकांत पवार यांचेही योगदान लाभले.
या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळण्यासोबतच त्यांच्या हाताला रोजगार उपलब्ध झाला आहे. स्थानिक उत्पादनांना योग्य व्यासपीठ मिळाल्यास महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले आहे, असे कंपनीच्या अध्यक्षा स्वरा देसाई आणि सेक्रेटरी हेमलता गिडये यांनी सांगितले.