कोकण रेल्वेचे ध्यासस्वप्न मधू दंडवते यांनी सत्यात उतरवले- अशोक करंबेळकर
कोकण रेल्वेचे ध्यासस्वप्न मधू दंडवते यांनी सत्यात उतरवले- अशोक करंबेळकर
मधु दंडवते यांचा 21वा स्मृतिदिन कणकवलीत संपन्न
भारतीय राजकारणातील अभ्यासू, तत्वनिष्ठ आणि समाजवादी विचारांचे पुरस्कर्ते, माजी केंद्रीय रेल्वेमंत्री प्रा. मधू दंडवते यांच्या स्मृतिदिनानिमित्त कणकवली रेल्वे स्टेशन येथे अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.नॅशनल रेल्वे मजदूर युनियन आणि ‘आम्ही कणकवलीकर ‘ या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने गेली सलग 21 वर्षे हा उपक्रम राबविण्यात येत आहे.कार्यक्रमाच्या प्रारंभी’आम्ही कणकवलीकर’ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री. अशोक करंबेळकर यांच्यासह नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वर्गीय मधू दंडवते यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कोकण रेल्वेचे ध्यासस्वप्न मधू दंडवते यांनी सत्यात उतरवले- अशोक करंबेळकर
यावेळी ज्येष्ठ पत्रकार तथा ‘आम्ही कणकवलीकर’ संस्थेचे अध्यक्ष अशोक करंबेळकर यांनी मधू दंडवते यांच्या साधेपणाचा आणि कार्याचा गौरव केला. प्रा. मधू दंडवते यांनी कोकण रेल्वेचे स्वप्न केवळ पाहिले नाही, तर ते ध्यास म्हणून स्वीकारून प्रत्यक्षात उतरवले. कोकणाप्रती असलेला त्यांचा जिव्हाळा, कोकणातील जनतेशी निर्माण झालेले आत्मीयतेचे नाते आणि त्यांचा संपूर्ण राजकीय प्रवास प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कॉम्रेड प्रशांत सावंत यांनी प्रा. मधू दंडवते यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, कोकण रेल्वेच्या निर्मितीतील त्यांच्या योगदानाचा, सामान्य रेल्वे प्रवाशांप्रती असलेल्या संवेदनशीलतेचा आणि कामगार चळवळीशी असलेल्या त्यांच्या नात्याचा आढावा घेतला.
नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे विभागीय अध्यक्ष कॉम्रेड रमाकांत नाडकर्णी यांनी १९७४ मधील ऐतिहासिक रेल्वे संपाच्या आठवणींना उजाळा दिला. या संपानंतर सेवेतून कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याबाबत मधू दंडवते यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचा त्यांनी विशेष उल्लेख केला.
‘आम्ही कणकवलीकर’ संस्थेचे सदस्य तथा पत्रकार विजय गांवकर यांनी आपल्या मनोगतात नानांच्या कोकणप्रेमाचा उल्लेख केला. मधू दंडवते यांचा जन्म कोकणात झाला नसला, तरी अहमदनगरहून येऊन त्यांनी कोकणातील प्रत्येक माणसाच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. संसदेत कोकणच्या प्रश्नांसाठी त्यांनी मांडलेले विचार आणि कोकणाच्या विकासाप्रती असलेली त्यांची आस्था याविषयी त्यांनी भावना व्यक्त केल्या.
नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे संघटक सचिव कॉम्रेड संजय खरविले यांनी मधू दंडवते यांचे विचार आणि कामगार चळवळीतील त्यांचे योगदान यावर प्रकाश टाकला. यावेळी त्यांनी कोकण रेल्वेच्या कणकवली स्थानकात मोफत वाचनालय सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण संकल्प जाहीर केला. या वाचनालयाचे उद्घाटन नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री कॉम्रेड वेणू पी. नायर यांच्या हस्ते मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे कणकवली शाखा सचिव कॉम्रेड प्रशांत तांबे यांनी केले. या कार्यक्रमाला युनियनचे कणकवली शाखाध्यक्ष कॉम्रेड भाऊ चिरेकर, निशा तेरसे, उमेश वाळके, पाटील, गुरव, कांबळे यांच्यासह युनियनचे पदाधिकारी, सभासद, कोकण रेल्वेचे कर्मचारी आणि मधू दंडवते यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.