आंबोलीत ५३ व्या सबज्युनिअर राज्य ज्यूदो स्पर्धेचा दिमाखदार शुभारंभ; २६ जिल्ह्यांतील ३०० हून अधिक खेळाडूंचा सहभाग

0
5
आंबोलीत ५३ व्या सबज्युनिअर राज्य ज्यूदो स्पर्धेचा दिमाखदार शुभारंभ
आंबोलीत ५३ व्या सबज्युनिअर राज्य ज्यूदो स्पर्धेचा दिमाखदार शुभारंभ

आंबोलीत ५३ व्या सबज्युनिअर राज्य ज्यूदो स्पर्धेचा दिमाखदार शुभारंभ; २६ जिल्ह्यांतील ३०० हून अधिक खेळाडूंचा सहभाग

यवतमाळ, धुळे, लातूर आणि रायगडच्या खेळाडूंनी गाजवला पहिला दिवस; राष्ट्रीय स्पर्धेसाठी होणार निवड

आंबोली प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पुनीत बालन प्रस्तुत महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशन आयोजित आणि सिंधुदुर्ग जिल्हा ज्यूदो असोसिएशनच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ५३ व्या सबज्युनिअर (१५ वर्षांखालील मुले व मुली) राज्य ज्यूदो स्पर्धा व राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आंबोली पब्लिक स्कूल व आंबोली विद्यानिकेतन येथे या स्पर्धेचा दिमाखदार शुभारंभ झाला.

राज्यातील २६ जिल्ह्यांमधील ३०० हून अधिक युवा ज्यूदोपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला असून, १०० हून अधिक प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक आणि पंच उपस्थित आहेत. स्पर्धेचे उद्घाटन आंबोली पब्लिक स्कूल व आंबोली विद्यानिकेतनचे संस्थापक सचिव तथा प्राचार्य विलास मोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्यूदोचे जागतिक संस्थापक डॉ. जिगोरो कानो आणि भारतीय ज्यूदोचे संस्थापक गुरुवर्य आर. डी. खानिवाले यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच महाबली हनुमान आणि सद्गुरू गजानन महाराज यांच्या प्रतिमांचे पूजनही करण्यात आले.

उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनचे महासचिव दत्ता आफळे, खजिनदार रवींद्र मेटकर, महाराष्ट्र राज्य क्रीडा उपसंचालक चंद्रशेखर साखरे, टूर्नामेंट डायरेक्टर अतुल बामनोदकर, टेक्निकल चेअरमन दर्शना लखानी, टेक्निकल सेक्रेटरी योगेश धाडवे, महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनचे पदाधिकारी मुकुंद डांगे, वृषाली लिंग्रस, सिंधुदुर्ग जिल्हा ज्यूदो असोसिएशनचे सचिव दत्तात्रय मारकड, खजिनदार अभिजित शेट्ये, पदाधिकारी चंद्रकांत शिंदे, सोनू जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर जमादाडे यांनी केले.
राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड
१५ वर्षांखालील मुले व मुलींसाठी आयोजित या राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळविलेल्या खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. विविध वजनी गटांमध्ये तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची लखनौ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे. त्यामुळे युवा ज्यूदोपटूंसाठी राष्ट्रीय स्तरावर चमकण्याची ही महत्त्वपूर्ण संधी ठरणार आहे.
यवतमाळ, धुळे, लातूर आणि रायगडच्या खेळाडूंचे यश
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी झालेल्या मुलांच्या विविध वजनी गटांतील लढतींमध्ये यवतमाळ, धुळे, लातूर आणि रायगड जिल्ह्यांतील खेळाडूंनी विशेष चमक दाखवली. विजेत्यांची वजनी गटनिहाय यादी पुढीलप्रमाणे :
वजनी गट प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक
३० किलो विराज चव्हाण (यवतमाळ) स्वराज सरनाईक (नागपूर) पार्थ पाटील (कोल्हापूर), श्रेयस सोळंके (छत्रपती संभाजीनगर)
३५ किलो यश पगारे (धुळे) स्वराज सुरवसे (बीड) वंश वराडे (नाशिक), वेदांत दुरबुडे (वर्धा)
४० किलो वेदांत पारधी (यवतमाळ) प्रतीक कुशवाह (अमरावती) चिन्मय दाभोळे (वर्धा), प्रतीक चव्हाण (पीडीजेए)
४५ किलो प्रिन्स सोनवणे (लातूर) प्रज्वल यादव (कोल्हापूर) आरंभ शिंदे (धाराशिव), वेदांत विचारे (मुंबई)
६० किलो कुशान त्रिवेदी (रायगड) भुविक पोजारी (ठाणे) जिजाबा मंगाडे (पीडीजेए), पार्थ रंगारी (अमरावती)
इतर वजनी गटांतील स्पर्धा रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. रविवारी मुलींच्या विविध वजनी गटांतील स्पर्धा पार पडणार आहेत.
सिंधुदुर्गच्या क्रीडा क्षेत्रासाठी ऐतिहासिक पर्व
आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा असलेल्या ज्यूदो या क्रीडा प्रकाराची राज्यस्तरीय स्पर्धा प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असल्याने जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी हा ऐतिहासिक क्षण ठरला आहे. आंबोलीच्या निसर्गरम्य वातावरणात राज्यभरातील उदयोन्मुख खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळत आहे. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची राज्याच्या क्रीडा नकाशावरील ओळख अधिक ठळक होण्यास मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here