महसूल सेवक (कोतवाल) पदभरतीची परीक्षा पुढे ढकलली; आता १७ जानेवारी २०२७ रोजी लेखी परीक्षा
महसूल सेवक (कोतवाल) पदभरतीची परीक्षा पुढे ढकलली; आता १७ जानेवारी २०२७ रोजी लेखी परीक्षा
पाहा संपूर्ण वेळापत्रक
कोकण :
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने कोकण व नाशिक विभागातील महसूल सेवक (कोतवाल) पदभरतीसाठी १५ नोव्हेंबर २०२६ रोजी नियोजित केलेली लेखी परीक्षा पुढे ढकलली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार आता ही परीक्षा १७ जानेवारी २०२७ रोजी घेण्यात येणार आहे. याबाबत महसूल व वन विभागाने १२ नोव्हेंबर २०२६ रोजी शासन पत्राद्वारे माहिती दिली आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या ५ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार पदभरती प्रक्रियेसंदर्भात देण्यात आलेली वयोमर्यादेची शिथिलता महसूल सेवक पदभरतीस लागू करण्याबाबत शासन स्तरावर सामान्य प्रशासन विभागाचे अभिप्राय घेण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच राज्यातील इतर महसुली विभागांमध्ये निवडणूक आचारसंहितेमुळे स्थगित झालेल्या आणि कोकण विभागातील पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा एकत्रितपणे घेण्याच्या दृष्टीने सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.
असे आहे कोतवाल पदभरतीचे सुधारित वेळापत्रक
सुधारित वेळापत्रकानुसार ३१ ऑगस्ट २०२६ रोजीच्या रिक्त पदांच्या स्थितीनुसार २३ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत तालुकानिहाय रिक्त जागांची यादी तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर १ ते १५ डिसेंबरदरम्यान रिक्त जागांनुसार बिंदुनामावली तयार केली जाईल.
१५ डिसेंबर रोजी परीक्षा भरती समिती स्थापन करण्यात येणार असून, १६ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. १ ते ७ जानेवारी २०२७ या कालावधीत प्राप्त अर्जांची छाननी करण्यात येईल. पात्र उमेदवारांना ८ ते १५ जानेवारीदरम्यान प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
त्यानंतर १७ जानेवारी २०२७ रोजी लेखी परीक्षा होईल. १८ जानेवारी रोजी उत्तरसूची व निकाल जाहीर करण्यात येणार असून, १८ ते २५ जानेवारीदरम्यान कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. पात्र उमेदवारांना २६ जानेवारी २०२७ रोजी अंतिम नियुक्तीपत्र देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
परीक्षार्थींनी नोंद घ्यावी
महसूल सेवक (कोतवाल) पदभरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी १५ नोव्हेंबर २०२६ रोजी परीक्षा होणार नसल्याची नोंद घ्यावी. तसेच सुधारित वेळापत्रकानुसार भरती प्रक्रियेची पुढील तयारी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.