पुण्यात NHEC च्या भूमिपूजनासह सहकार संस्थांच्या प्रादेशिक कार्यालयाचे उद्घाटन; ‘भारत टॅक्सी’चा शुभारंभ
तळेगाव दाभाडे (पुणे) :
तळेगाव दाभाडे येथे NHEC च्या भूमिपूजन समारंभासह केंद्रीय सहकारी संस्था निबंधकांच्या प्रादेशिक कार्यालयाचे उद्घाटन आणि ‘भारत टॅक्सी’ सेवेचा शुभारंभ केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर आणि केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.

पुण्यात सुरू करण्यात आलेल्या केंद्रीय सहकारी संस्था निबंधकांच्या प्रादेशिक कार्यालयामुळे महाराष्ट्रासह पश्चिम भारतातील सहकारी संस्थांना स्थानिक पातळीवर विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत. या कार्यालयासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांचे स्वप्न साकार होताना पाहणे ही आनंदाची आणि समाधानाची बाब असल्याची भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली.
१९७४ मध्ये स्थापन झालेल्या NHEC संस्थेच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्र सरकारने १,५०० कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. यावेळी संस्थेचे पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच कामगारांचे प्रश्नही लवकर मार्गी लागतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
दिवंगत अजित पवार यांनी सहकार क्षेत्राच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचाही सुनेत्रा पवार यांनी उल्लेख केला. सहकारी साखर कारखान्यांचा ९,५०० कोटी रुपयांचा प्राप्तिकराचा प्रश्न मार्गी लागणे आणि मोलॅसिसवरील कर २८ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी होणे, हे साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय ठरल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी ‘भारत टॅक्सी’ या सहकारी तत्त्वावरील वाहतूक उपक्रमाचाही शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमामुळे वाहनचालकांना केवळ रोजगाराची संधी मिळणार नसून मालकी, निर्णयप्रक्रियेतील सहभाग आणि नफ्यात वाटाही मिळणार आहे. पुण्यातील जवळपास ३५ हजार सारथींना या उपक्रमाचा लाभ होण्याची अपेक्षा आहे. महिला चालकांसाठी ‘सारथी दीदी’ ही विशेष सुविधा उपलब्ध करण्यात येणार असून पात्र चालकांना आयुष्मान भारत योजनेंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य संरक्षण मिळणार आहे.
‘भारत टॅक्सी’मुळे चालकांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यासोबतच प्रवाशांना परवडणारी वाहतूक सेवा उपलब्ध होण्यास मदत होईल. सहकार क्षेत्राच्या विकासाचे अजितदादांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने हे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरतील आणि सहकार चळवळीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करून सुनेत्रा पवार यांनी या उपक्रमांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


