रत्नागिरी जिल्हा परिषद शाळांतील २६ विद्यार्थी नासा अभ्यास दौऱ्यासाठी रवाना; सलग चौथ्या वर्षी उपक्रम
उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकारातून जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उपक्रम यशस्वी; मुंबईत विद्यार्थ्यांशी साधला संवाद
रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा चमू १२ नोव्हेंबर रोजी अमेरिकेतील जगप्रसिद्ध नासा (NASA) संस्थेच्या अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या अंतराळ विज्ञानाची प्रत्यक्ष ओळख करून देणारा जिल्हा परिषदेचा हा सलग चौथ्या वर्षी आयोजित करण्यात आलेला आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा आहे.

राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या विशेष पुढाकारातून आणि जिल्हा नियोजन समितीमार्फत (DPC) उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीमुळे हा महत्त्वाकांक्षी उपक्रम यंदाही यशस्वी झाला आहे. या प्रकल्पासाठी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदाल (IAS) यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे.
यंदाच्या अभ्यास दौऱ्यासाठी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील एकूण २६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये १४ मुली आणि १२ मुलांचा समावेश आहे. तसेच रत्नागिरी नगरपरिषदेच्या दोन विद्यार्थ्यांचाही या चमूमध्ये समावेश आहे. विद्यार्थ्यांसोबत मार्गदर्शन आणि नियोजनासाठी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचा चमूही रवाना झाला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी मुंबई येथे विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच आवश्यक सूचना केल्या.
उदय सामंत यांच्याकडून विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजन
अमेरिकेच्या अभ्यास दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) येथे खास स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्याशी गप्पा मारत अभ्यास दौऱ्यासह पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
अंतराळवीर प्रशिक्षणाचा प्रत्यक्ष अनुभव
या अभ्यास दौऱ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांना नासा येथे ‘अॅस्ट्रोनॉट ट्रेनिंग एक्सपिरियन्स’ (Astronaut Training Experience) या कार्यक्रमांतर्गत अंतराळवीर प्रशिक्षणाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. तसेच अमेरिकेतील प्रसिद्ध केनेडी स्पेस सेंटर येथे तीन दिवसांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. या काळात विद्यार्थ्यांना अवकाश संशोधन, रॉकेट प्रक्षेपण तंत्रज्ञान आणि विविध अंतराळ मोहिमांची सविस्तर माहिती मिळणार आहे.
नासा आणि केनेडी स्पेस सेंटरच्या अभ्यास दौऱ्यानंतर हा विद्यार्थी चमू अमेरिकेतील अन्य महत्त्वाच्या वैज्ञानिक आणि ऐतिहासिक स्थळांनाही भेट देणार आहे.
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, त्यांना जागतिक स्तरावरील विज्ञान आणि तंत्रज्ञानाची ओळख व्हावी तसेच त्यांच्या शैक्षणिक क्षितिजाचा विस्तार व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे पालक आणि शिक्षण क्षेत्रातून कौतुक होत असून, जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने सर्व विद्यार्थी आणि अधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी जिल्हा परिषद शाळांतील २६ विद्यार्थी नासा अभ्यास दौऱ्यासाठी रवाना; सलग चौथ्या वर्षी उपक्रम


