नवी मुंबई महापौर चषक किल्ले बांधणी स्पर्धेला १४९ समूहांचा प्रतिसाद; २५ किल्ले अंतिम फेरीत

0
10
नवी मुंबई महापौर चषक किल्ले बांधणी स्पर्धेला १४९ समूहांचा प्रतिसाद; २५ किल्ले अंतिम फेरीत
नवी मुंबई महापौर चषक किल्ले बांधणी स्पर्धेला १४९ समूहांचा प्रतिसाद; २५ किल्ले अंतिम फेरीत

नवी मुंबई महापौर चषक किल्ले बांधणी स्पर्धेला १४९ समूहांचा प्रतिसाद; २५ किल्ले अंतिम फेरीत

खुल्या गटात प्रथम क्रमांकासाठी ३० हजार, तर शालेय गटात २० हजारांचे पारितोषिक

नवी मुंबई / प्रतिनिधी :
दिवाळीच्या निमित्ताने बालगोपाळांकडून अंगणात किल्ले उभारण्याची परंपरा जपण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास व स्वराज्याची प्रेरणा नव्या पिढीच्या मनामनात रुजविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘नवी मुंबई महापौर चषक किल्ले बांधणी स्पर्धा २०२६-२७’ ला तब्बल १४९ समूहांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नवी मुंबई महापौर चषक किल्ले बांधणी स्पर्धेत २०२६-२७ मध्ये १४९ समूह सहभागी झाले. प्राथमिक फेरीतून २५ किल्ल्यांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली असून विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके दिली जाणार आहेत.

या स्पर्धेत शालेय गटातील २६ आणि खुल्या गटातील १२३ अशा एकूण १४९ समूहांनी सहभाग घेतला. महाराष्ट्राच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाचे जतन, दुर्गसंवर्धनाविषयी जनजागृती आणि लहान मुले व युवकांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरल्याचे समाधान महापौर सुजाता पाटील यांनी व्यक्त केले.
स्पर्धेसाठी नोंदणी केलेल्या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व १४९ किल्ले बांधणीच्या ठिकाणी परीक्षकांनी प्रत्यक्ष भेट देऊन प्राथमिक परीक्षण केले. जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे इतिहासप्रेमी फाईन आर्ट कलावंत शिवम घोडजकर आणि प्रशांत धाडवे यांनी किल्ल्यांची रचना, बांधकामातील रेखीवपणा आणि कलात्मकता यांची पाहणी केली. तसेच सहभागी मुलांकडून किल्ल्यांचा इतिहास आणि त्यासंबंधीची माहिती सादरीकरणातून जाणून घेतली. या सर्व किल्ल्यांचे छायाचित्रण आणि व्हिडिओ चित्रीकरण महानगरपालिकेमार्फत करण्यात आले.
२५ किल्ल्यांची अंतिम फेरीसाठी निवड
प्राथमिक फेरीतून शालेय गटातील ६ आणि खुल्या गटातील १९ अशा एकूण २५ किल्ल्यांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. अंतिम परीक्षणानंतर प्रत्येक गटातील उत्कृष्ट तीन किल्ल्यांना तसेच तीन उत्तेजनार्थ किल्ल्यांना स्मृतिचिन्ह आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.
अशी आहेत पारितोषिके
खुल्या गटातील विजेत्यांसाठी प्रथम क्रमांकाला ३० हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला २० हजार रुपये आणि तृतीय क्रमांकाला १० हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.
शालेय गटात प्रथम क्रमांकासाठी २० हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी १० हजार रुपये देण्यात येणार आहेत. याशिवाय दोन्ही गटांमध्ये प्रत्येकी तीन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी ५ हजार रुपये अशी देण्यात येणार आहेत.
महापौर सुजाता सुरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा, सांस्कृतिक व युवक कल्याण समितीचे सभापती गिरीश कान्हा म्हात्रे, उपसभापती राजू भालचंद्र मढवी आणि समितीच्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
दिवाळीत किल्ले उभारण्याची परंपरा जपत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासाची ओळख नव्या पिढीला करून देणाऱ्या या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद उल्लेखनीय आहे. या माध्यमातून ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासोबतच बालगोपाळांच्या कल्पकतेला आणि कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here