शेतीपूरक व्यवसायांना आर्थिक बळ देणार; जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे यांची ग्वाही
शेतीपूरक व्यवसायांना आर्थिक बळ देणार; जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे यांची ग्वाही
सिंधुदुर्गात दररोज एक लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट; जनावरांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना २० हजारांची मदत
वैभववाडी :
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसायांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दररोज एक लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट जिल्हा बँकेने निश्चित केले असून, हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेच्या माध्यमातून आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाईल. तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून सिंधुरत्न योजनेतूनही जनावरे खरेदीसाठी शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हा बँकेचे संचालक दिलीप रावराणे यांनी दिली.
आचिर्णे येथे कृषी विभागाच्या आत्मा, पंचायत समिती वैभववाडी आणि उमेद अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने किसान गोष्टी अंतर्गत कलिंगड लागवड मार्गदर्शन व पशुपालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर पंचायत समिती सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते, जिल्हा बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, गोकुळ दूध संघ कोल्हापूरचे प्राचार्य एम. पी. पाटील, मालवण येथील प्रगतशील शेतकरी सुरेश मापारी, आत्मा सिंधुदुर्गच्या प्रकल्प उपसंचालक प्रगती तावरे, गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, जिल्हा परिषद सदस्य रिद्धी सुतार, पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, आत्मा अध्यक्ष मंगेश कदम, जयसिंग रावराणे, तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख, सहाय्यक गटविकास अधिकारी स्नेहा माने, गटशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात, महेश संसारे, उत्तम सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना दिलीप रावराणे म्हणाले की, तालुका आत्मा समितीचे काम नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असून, विविध उपक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून एक हजार दुधाळ जनावरे खरेदी करण्याचे नियोजन आहे. तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून सिंधुरत्न योजनेअंतर्गत जनावरे खरेदीसाठी प्रत्येक शेतकऱ्याला २० हजार रुपयांची मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पंचायत समिती सभापती सिद्धेश रावराणे यांनी शेतीपूरक व्यवसायांमध्ये महिलांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीमध्ये महिलांची भूमिका महत्त्वाची असून, कुटुंबाचे उत्पन्न वाढविण्यासाठी महिलांचे सहकार्य आवश्यक आहे. याशिवाय शेतकऱ्यांनी मत्स्य व्यवसायाशी संबंधित विविध शासकीय योजनांचाही लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
गोकुळ दूध संघाचे प्राचार्य एम. पी. पाटील यांनी दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पन्नाचा चांगला पर्याय असल्याचे सांगितले. दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी गोकुळ दूध संघ खंबीरपणे उभा असून, संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी ३२ विविध योजना उपलब्ध आहेत. तळकोकणात दुग्ध व्यवसायाच्या वाढीसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
प्रगतशील शेतकरी सुरेश मापारी यांनी कलिंगड लागवड, पीक व्यवस्थापन आणि नियोजन याविषयी मार्गदर्शन केले. कलिंगड हे चांगले आर्थिक उत्पन्न मिळवून देणारे पीक असून, एका एकरात सुमारे चार हजार रोपांची लागवड करता येते. या पिकाला स्थानिक बाजारपेठही उपलब्ध आहे. कलिंगड लागवडीबरोबरच प्रत्येक शेतकऱ्याने किमान एक गाय पाळण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मंगेश कदम, प्रिमेश वाघ, महेश संसारे आणि जिल्हा बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कृषी सहाय्यक बालाजी वाघमोडे यांनी मानले.