मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावरील प्रदूषण रोखण्यासाठी ‘द ओशन क्लीनअप’सोबत महापालिकेचा करार
मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावरील प्रदूषण रोखण्यासाठी ‘द ओशन क्लीनअप’सोबत महापालिकेचा करार
आणखी ९ ठिकाणी इंटरसेप्टर यंत्रणा कार्यान्वित होणार; सप्टेंबर २०२६ पर्यंत ट्रॉम्बे व मालाड खाडीतून ११९.५ मेट्रिक टन कचरा संकलित
मुंबई : मुंबईच्या सागरी किनारपट्टीवरील प्रदूषण कमी करून समुद्र स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिका आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेली ‘द ओशन क्लीनअप’ संस्था यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या करारामुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने समुद्रात वाहून जाणारा प्लास्टिक आणि घनकचरा रोखण्याच्या प्रयत्नांना अधिक गती मिळणार आहे.
मुंबईच्या प्रथम सेविका यांच्या उपस्थितीत हा करार सोहळा पार पडला. इंटरसेप्टर प्रणालीच्या माध्यमातून सप्टेंबर २०२६ पर्यंत ट्रॉम्बे आणि मालाड खाडीतून एकूण ११९.५ मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला आहे. आता नव्या करारानुसार मुंबईतील आणखी नऊ महत्त्वाच्या ठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. यामध्ये दादर-धारावी, पिरामल, गजधरबंध, मिठी नदी, ट्रॉम्बे खाडी, कला नगर, राजेंद्र नगर, माहुल आणि मालवणी नाला या ठिकाणांचा समावेश आहे.
महापालिकेने यापूर्वी उभारलेल्या १४ ट्रॅश बूम्स आणि नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांना या आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे. त्यामुळे नाल्यांमधून आणि नद्यांमधून समुद्रात जाणारा प्लास्टिक व इतर घनकचरा अडविण्यास मदत होणार आहे.
या सोहळ्याला उपमहापौर संजय घाडी, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, नेदरलँड दूतावासाचे महावाणिज्यदूत नबील तौवाती, ‘द ओशन क्लीनअप’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी बोयन स्लॅट, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, उपआयुक्त (पायाभूत सुविधा) गिरीश निकम, उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) मेहुल पेंटर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व अभियंते उपस्थित होते. या उपक्रमाला ‘प्लास्टिक फिशर’ आणि ‘युनायटेड वे मुंबई’ या भागीदार संस्थांचेही सहकार्य लाभत आहे.
पर्यावरण संवर्धनाची ही मोहीम केवळ प्रशासनापुरती मर्यादित नसून नागरिकांचाही त्यात सहभाग आवश्यक आहे. नाले, नद्या आणि समुद्रकिनाऱ्यांवर कचरा टाकू नये, असे आवाहन मुंबईकरांना करण्यात आले आहे. प्रशासन, सीएसआर भागीदार संस्था आणि नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांतून स्वच्छ व हरित मुंबईचे ध्येय साध्य करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.