सिंधुदुर्गातील ३३५ आंबा-काजू बागांमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर; उत्पादनात २५ टक्के वाढीचे उद्दिष्ट
सिंधुदुर्गातील ३३५ आंबा-काजू बागांमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर; उत्पादनात २५ टक्के वाढीचे उद्दिष्ट
सिंधुदुर्गातील ३३५ बागांमध्ये प्रकल्प सुरू
सिंधुदुर्ग :
कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आता आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढविणे आणि बागायतदारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे.
बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून सुरू असलेल्या या प्रकल्पांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३३५ आंबा-काजू बागांमध्ये प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांमधील एकूण ४०० शेतकऱ्यांचा या प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे.
या प्रकल्पाचा आढावा घेताना अधिकाधिक बागायतदारांपर्यंत एआय तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी मोबाईल ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याच्या सूचना देण्यात आल्या. उत्पादन खर्च कमी करून आंबा-काजूचे उत्पादन आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यावर विशेष भर देण्याचे निर्देशही देण्यात आले.
या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोबाईल ॲपवर हवामानातील बदल, बागेची सद्यस्थिती, रोग-किडींचा प्रादुर्भाव आणि त्यावरील आवश्यक कृषी उपाययोजनांची माहिती शेतकऱ्यांना वेळेत उपलब्ध होणार आहे. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन शेतीचे नियोजन करणे शक्य होणार आहे.
या प्रकल्पामुळे आंबा-काजू उत्पादनात २० ते २५ टक्क्यांनी वाढ होण्याची, तसेच पाणी, खते आणि कीटकनाशकांच्या वापरात २० ते ३० टक्क्यांपर्यंत बचत होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिसून यावेत, यासाठी दरमहा आढावा घेण्यात येणार आहे.
या बैठकीला सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासूर, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष दादा साईल आणि माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.