पुण्यातील देशी गाय संशोधन केंद्राच्या विस्तारासाठी ४६ कोटींची मंजुरी; सुनेत्रा पवार यांची माहिती
पुण्यातील देशी गाय संशोधन केंद्राच्या विस्तारासाठी ४६ कोटींची मंजुरी; सुनेत्रा पवार यांची माहिती
संशोधन, प्रशिक्षण आणि कृषी पर्यटनाला मिळणार चालना; देशी गोवंश संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण प्रकल्प – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
पुणे :
देशी गोवंशाचे संवर्धन, संशोधन आणि दुग्धव्यवसायाशी संबंधित आधुनिक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने पुण्यातील अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचा विस्तार करण्यात येणार आहे. या केंद्राच्या टप्पा-२ साठी ४६ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या निर्णयामुळे देशी गोवंश संशोधन, प्रशिक्षण आणि कृषी पर्यटनाला नवी दिशा मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
या प्रकल्पाच्या माध्यमातून देशी गायींच्या विविध जातींचे संवर्धन, त्यांच्यावरील संशोधन आणि पशुपालकांना आधुनिक पद्धतींचे प्रशिक्षण देण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच कृषी पर्यटनाच्या माध्यमातून नागरिकांना देशी गोवंश, त्यांचे महत्त्व आणि पारंपरिक पशुपालन पद्धतींची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
देशी गोवंशाचे संरक्षण आणि संवर्धन ही काळाची गरज असून, त्यासाठी संशोधन व प्रशिक्षणाच्या सुविधा अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचा दुसरा टप्पा या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.
या प्रकल्पामुळे देशी गोवंश संवर्धनाला चालना मिळण्याबरोबरच पशुपालक, शेतकरी आणि कृषी क्षेत्राशी संबंधित घटकांना संशोधन व प्रशिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.