उल्हासनगरच्या सीएचएम महाविद्यालयाच्या नव्या इमारतीचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
उल्हासनगरच्या सीएचएम महाविद्यालयाच्या नव्या इमारतीचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
सिंधी समाजाच्या कर्तृत्वाचा गौरव; उल्हासनगरच्या विकासासाठी मेट्रो, उड्डाणपूल, काँक्रीट रस्ते आणि स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेची घोषणा
उल्हासनगर :
हैदराबाद (सिंध) नॅशनल कॉलेजिएट बोर्डाच्या चंदीबाई हिंमतमल मनसुखानी (सीएचएम) महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी फाळणीनंतर प्रतिकूल परिस्थितीतही मेहनत, जिद्द आणि उद्यमशीलतेच्या जोरावर विविध क्षेत्रांत यश संपादन करणाऱ्या सिंधी समाजाच्या योगदानाचा गौरव केला.
उल्हासनगरच्या सीएचएम महाविद्यालयाच्या नव्या इमारतीचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
शिक्षणाकडे केवळ व्यवसाय म्हणून न पाहता समाजनिर्मितीचे प्रभावी माध्यम म्हणून पाहण्याची संस्थेची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. सीएचएम महाविद्यालयाची नूतन इमारत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याची आणि संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीची नवी पायाभरणी ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी उल्हासनगर शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासाबाबतही मुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. शहराच्या विकासाला गती देण्यासाठी मेट्रो, काँक्रीट रस्ते, उड्डाणपूल आणि स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेची कामे हाती घेण्यात येत आहेत. उल्हासनगरला नियोजनबद्ध शहराचे स्वरूप देण्यासाठी अनधिकृत घरांचा प्रश्न मार्गी लावणे आणि क्लस्टर विकासाच्या माध्यमातून व्यापक विकास आराखडा तयार करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच सिंधी समाजातील नागरिकांना जमिनीचे मालकी हक्क मिळावेत आणि जमिनी फ्रीहोल्ड करण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी लवकरच उल्हासनगरमध्ये ही प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
यावेळी एचएसएनसी बोर्डाचे अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा सादर केला. शिक्षण आणि रोजगार यांच्यातील दरी कमी करण्यासाठी कौशल्याधारित प्रशिक्षणावर संस्थेचा विशेष भर असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवकांना प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती दिली.
या कार्यक्रमाला आमदार कुमार आयलानी, आमदार किसन कथोरे, आमदार सुलभाताई गायकवाड, एचएसएनसी बोर्डाचे अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे आणि संस्थेचे विश्वस्त किशू मनसुखानी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.