दिनदर्शिकांमध्ये बाळशास्त्री जांभेकरांच्या तीन महत्त्वाच्या दिवसांची अचूक नोंद करा; ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांचे प्रकाशकांना आवाहन
फलटण :
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याशी संबंधित जयंती, पुण्यतिथी आणि मराठी पत्रकार दिन या तीन महत्त्वाच्या दिवसांची दिनदर्शिकांमध्ये अचूक नोंद प्रसिद्ध करावी, असे आवाहन महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष तथा आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्मारक प्रकल्पाचे प्रमुख, ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांनी केले आहे.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विविध वृत्तपत्रे, वृत्तसंस्था आणि प्रकाशन संस्थांकडून दरवर्षी दिनदर्शिकांचे प्रकाशन केले जाते. या दिनदर्शिकांमध्ये महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी तसेच ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या दिवसांचा समावेश असतो. मात्र, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याशी संबंधित तीन महत्त्वाच्या दिवसांच्या नोंदी करताना अनेकदा चुकीची माहिती प्रसिद्ध होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही चूक टाळून सर्व प्रकाशकांनी अचूक माहिती प्रसिद्ध करावी, असे बेडकिहाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची २० फेब्रुवारी रोजी जयंती, तर १७ मे रोजी पुण्यतिथी असते. तसेच ६ जानेवारी १८३२ रोजी त्यांनी मराठीतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ ६ जानेवारी हा दिवस राज्यात ‘मराठी पत्रकार दिन’ किंवा ‘दर्पण दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे हे तीनही दिवस मराठी पत्रकारितेच्या इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत.
मात्र, काही दिनदर्शिकांमध्ये ६ जानेवारी रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती असल्याचा चुकीचा उल्लेख केला जातो. वास्तविक, ६ जानेवारी हा त्यांचा जन्मदिन नसून मराठीतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ सुरू झाल्याचा ऐतिहासिक दिवस आहे. त्यामुळे या तारखेबाबतचा संभ्रम दूर होऊन योग्य माहिती जनतेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून यासंदर्भात राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून शासनाच्या महापुरुषांच्या जयंती अभिवादन यादीमध्ये २० फेब्रुवारी या दिवशी आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीचा समावेश करण्यात आला. त्यानुसार राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये प्रतिवर्षी जांभेकर जयंतीनिमित्त अभिवादन केले जाते, ही समाधानाची बाब असल्याचे बेडकिहाळ यांनी नमूद केले.
त्याच धर्तीवर राज्यातील सर्व वृत्तपत्रे, वृत्तसंस्था, प्रकाशन संस्था आणि दिनदर्शिका प्रकाशकांनी आपल्या दिनदर्शिकांमध्ये २० फेब्रुवारी – आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती, १७ मे – आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुण्यतिथी आणि ६ जानेवारी – मराठी पत्रकार दिन (दर्पण दिन) अशा अचूक नोंदी कराव्यात, असे आवाहन रविंद्र बेडकिहाळ यांनी केले आहे. मराठी पत्रकारितेचा गौरवशाली इतिहास आणि आचार्य जांभेकर यांचे योगदान नव्या पिढीपर्यंत योग्य स्वरूपात पोहोचविण्यासाठी सर्वांनी दक्षता घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.