नांदगाव येथे २६ व २७ नोव्हेंबरला ५४ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन
नांदगाव येथे २६ व २७ नोव्हेंबरला ५४ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन; पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन
कणकवली :
विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधन वृत्ती आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने ५४ व्या कणकवली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, २६ आणि शुक्रवार, २७ नोव्हेंबर २०२६ रोजी नांदगाव येथील सरस्वती हायस्कूलमध्ये हे प्रदर्शन होणार आहे. नांदगाव पंचक्रोशी माध्यमिक शिक्षण संस्थेच्या संचलनाखालील सरस्वती हायस्कूल या प्रदर्शनाचे यजमानपद भूषविणार आहे.
या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे. विधानपरिषदेचे आमदार प्रमोद जठार हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. पंचायत समिती कणकवलीच्या सभापती हर्षदा वाळके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
यावेळी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, समाजकल्याण सभापती रुहिता तांबे, पंचायत समिती उपसभापती राजेश सावंत, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्या प्राची इजवलकर, जिल्हा परिषद सदस्य संतोष पारकर, नांदगावचे सरपंच रविराज मोरजकर आणि नांदगाव पंचक्रोशी माध्यमिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नागेश मोरये यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दोन दिवस विविध स्पर्धा आणि उपक्रम
प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता विद्यार्थ्यांची नोंदणी, तर ९.१५ वाजता विज्ञान प्रतिकृतींची मांडणी होईल. सकाळी १०.३० वाजता उद्घाटन समारंभ पार पडेल. त्यानंतर सकाळी ११ वाजता प्राथमिक व माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांच्या प्रतिकृतींचे परीक्षण आणि निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी १२ वाजता प्राथमिक व माध्यमिक गटांसाठी वक्तृत्व स्पर्धा होणार आहे.
शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता प्राथमिक व माध्यमिक विभागातील शिक्षकांनी तयार केलेल्या शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन व परीक्षण होईल. तसेच माध्यमिक विभागातील प्रयोगशाळा सहाय्यक आणि परिचर यांनी तयार केलेल्या शैक्षणिक साहित्याचेही प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता प्राथमिक व माध्यमिक गटांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा होईल. दुपारी २.३० वाजता समारोप आणि बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
बक्षीस वितरण समारंभाला मान्यवरांची उपस्थिती
शुक्रवारी दुपारी २.३० वाजता होणाऱ्या बक्षीस वितरण समारंभाला पंचायत समिती सभापती हर्षदा हनुमंत वाळके आणि नांदगाव पंचक्रोशी माध्यमिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नागेश मोरये यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमासाठी नांदगावचे सरपंच रविराज मोरजकर, तिवरेचे सरपंच रविंद्र आंबेलकर, असलदेचे सरपंच चंद्रकांत डामरे, बेळणे बुद्रुकचे सरपंच अविनाश गिरकर, ओटवचे उपसरपंच दुर्गेश ओटवकर, संस्थेचे उपाध्यक्ष दयानंद भिवाजी लोके, सचिव कृष्णा वसंत म्हसकर, खजिनदार सुभाष विडये, कार्यकारिणी सदस्य श्रीधर मोरये, अॅड. दीपक अंधारी आणि गजानन रेवडेकर यांच्यासह विविध मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.
याशिवाय सरस्वती हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधीर तांबे, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, सर्व विस्तार अधिकारी (शिक्षण), केंद्रप्रमुख, प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी, समग्र शिक्षण अभियान कणकवली तसेच कणकवली तालुका विज्ञान मंडळाचे पदाधिकारी या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.
तालुक्यातील विद्यार्थ्यांना आपल्या वैज्ञानिक कल्पना, संशोधनात्मक प्रयोग आणि नावीन्यपूर्ण प्रतिकृती सादर करण्यासाठी हे प्रदर्शन महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि संशोधन वृत्तीला प्रोत्साहन देणाऱ्या या विज्ञान प्रदर्शनाला विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि विज्ञानप्रेमींनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.