मुळदे येथे कृषी स्वयंचलित हवामान केंद्र सुरू; शेतकऱ्यांना मिळणार अचूक हवामान अंदाज आणि कृषी सल्ला
मुळदे येथे कृषी स्वयंचलित हवामान केंद्र सुरू; शेतकऱ्यांना मिळणार अचूक हवामान अंदाज आणि कृषी सल्ला
सिंधुदुर्ग :
बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना अचूक हवामान माहिती आणि शास्त्रीय कृषी सल्ला उपलब्ध करून देण्यासाठी मुळदे येथे कृषी स्वयंचलित हवामान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि भारतीय हवामान विभाग यांच्या सह-सामंजस्य करारांतर्गत क्षेत्रीय कृषी हवामान केंद्र, ग्रामीण कृषी मौसम सेवा, मुळदे येथे उभारण्यात आलेल्या या केंद्राचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या हस्ते २० नोव्हेंबर रोजी करण्यात आले.
मुळदे येथे कृषी स्वयंचलित हवामान केंद्र सुरू; शेतकऱ्यांना मिळणार अचूक हवामान अंदाज आणि कृषी सल्ला
यावेळी बोलताना कुलगुरू डॉ. संजय भावे म्हणाले की, कोकणातील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण, वितरण, पावसातील खंड आणि तापमानातील बदल यांचा थेट परिणाम शेती उत्पादनावर होतो. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती चिंताजनक असून, पाऊस कधी आणि किती पडणार याची अचूक माहिती शेतकऱ्यांना वेळेत मिळणे अत्यंत आवश्यक आहे. हवामानाचा अचूक वेध आणि कृषी सल्ल्याचा योग्य मेळ शेतकऱ्यांच्या निर्णयांना शास्त्रीय बळ देणारा ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या स्वयंचलित हवामान केंद्रातून पर्जन्यमान, तापमान, हवेतील आर्द्रता, वाऱ्याचा वेग व दिशा, हवेचा दाब, सौर प्रारण, सूर्यप्रकाशाचे तास तसेच जमिनीतील विविध खोलीवरील ओलावा आणि तापमान यांची नियमित नोंद उपलब्ध होणार आहे. या माहितीचा उपयोग स्थानिक हवामानाचा अभ्यास, हवामान अंदाजाची पडताळणी आणि शेतकऱ्यांना अधिक अचूक कृषी सल्ला देण्यासाठी होणार आहे.
या केंद्राचा भात, आंबा, काजू, नारळ, सुपारी तसेच भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना विशेष लाभ होणार आहे. पावसातील खंडाच्या काळात पाण्याचे योग्य व्यवस्थापन, संरक्षित सिंचन, आच्छादन तंत्रज्ञान, पर्यायी पीक नियोजन आणि संभाव्य नैसर्गिक नुकसानीची तीव्रता कमी करण्यासाठी हवामानावर आधारित मार्गदर्शन मिळण्यास मदत होणार आहे.
हवामान केंद्र हा केवळ तांत्रिक उपक्रम नसून शेतकऱ्यांच्या निर्णयक्षमतेला बळ देणारा महत्त्वाचा दुवा आहे. कृषी संशोधन, हवामान विश्लेषण आणि शास्त्रीय कृषी सल्ला प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्रे आणि कृषी विभागाने समन्वयाने काम करावे, असे आवाहन डॉ. भावे यांनी केले. तसेच या केंद्राच्या उभारणीत योगदान देणाऱ्या सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले.