चिपळूण शहरातील वालोपे परिसरात एका तरुणाच्या डोक्यावर जोरदार प्रहार करून त्याचा खून केल्याची घटना घडली होती. या गंभीर गुन्ह्याची दखल घेत चिपळूण पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून आरोपीला कोल्हापूर येथून ताब्यात घेतले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चिपळूण पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला. त्यानंतर चिपळूण पोलीस ठाण्याच्या पथकाने कोल्हापूर येथे जाऊन संशयित आरोपीला ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे (भा.पो.से.) आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस यांच्या नेतृत्वाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अभिजित थोरात, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे तसेच त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.