समान नागरी संहिता समितीची कोकण विभागातील जनसुनावणी पूर्ण; सात जिल्ह्यांतील नागरिकांशी संवाद

0
10
समान नागरी संहिता समितीची कोकण विभागातील जनसुनावणी पूर्ण; सात जिल्ह्यांतील नागरिकांशी संवाद
समान नागरी संहिता समितीची कोकण विभागातील जनसुनावणी पूर्ण; सात जिल्ह्यांतील नागरिकांशी संवाद

समान नागरी संहिता समितीची कोकण विभागातील जनसुनावणी पूर्ण; सात जिल्ह्यांतील नागरिकांशी संवाद

ठाणे :
समान नागरी संहितेसारख्या व्यापक आणि संवेदनशील विषयाचा अभ्यास करताना समाजातील विविध घटकांचे अनुभव, भावना आणि अपेक्षा जाणून घेण्याच्या उद्देशाने समान नागरी संहिता समितीने कोकण विभागात जनसुनावणी आयोजित केली. जनसुनावणीच्या दुसऱ्या दिवशी ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील नागरिकांशी समितीने संवाद साधला. यासह कोकण विभागातील सातही जिल्ह्यांतील जनसुनावणी प्रक्रिया पूर्ण झाली.
कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या जनसुनावणीदरम्यान नागरिकांना कोणताही संकोच न बाळगता आपली मते, भूमिका आणि अपेक्षा मांडता याव्यात, यावर समितीने विशेष भर दिला. नागरिकांनी मांडलेल्या मुद्द्यांमागील सामाजिक संदर्भ, अनुभव आणि कायदेशीर पैलू समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
जनसुनावणीच्या पहिल्या दिवशी मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांतील नागरिकांची मते जाणून घेण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांतील नागरिकांशी संवाद साधण्यात आला. त्यामुळे कोकण विभागातील सातही जिल्ह्यांची सुनावणी पूर्ण झाली.
या जनसुनावणीसाठी समितीचे सदस्य माजी न्यायमूर्ती संजय मेहरे, उत्तराखंडचे माजी मुख्य सचिव शत्रुघ्न सिंह, माजी मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, माजी महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ, शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सुवर्णा रावल, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, समितीच्या सचिव वर्षा ठाकूर-घुगे, विधी सल्लागार तन्वी आनंद आणि जय संकलेचा उपस्थित होते.
भारताची धार्मिक, भाषिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक विविधता जपत नागरी बाबींमध्ये समानता, न्याय, सुसूत्रता आणि कायदेशीर स्पष्टता निर्माण करण्याच्या दृष्टीने समिती अभ्यास करीत आहे. विवाहाचे कायदेशीर वय व नोंदणी, वैवाहिक हक्क आणि जबाबदाऱ्या, घटस्फोटाची प्रक्रिया व त्यासंबंधी अधिकार आणि संरक्षण, वारसा व उत्तराधिकार तसेच लिव्ह-इन रिलेशनशिपमधील व्यक्तींचे अधिकार, जबाबदाऱ्या व संरक्षण या प्रमुख विषयांचा अभ्यास केला जात आहे.
जनसुनावणीला प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसलेल्या नागरिकांसाठी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांमधून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत समान नागरी संहिता पोर्टलवर ३७ मुद्द्यांच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाइन अभिप्राय नोंदविता येणार आहे. अभिप्राय सादर करण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
नागरिकांच्या भावना आणि सामाजिक वास्तव समजून घेत, विविधतेचा आदर राखत तसेच संविधानिक मूल्यांच्या आधारे सर्वंकष अभ्यास करण्यावर या जनसुनावणीमध्ये भर देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here