युवा पिढीला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी जनजागृती; शिक्षणप्रेमी, समाजसुधारक आणि माजी विद्यार्थ्यांना उपस्थितीचे आवाहन
दोडामार्ग : शुभम गवस
युवा पिढीला व्यसनांच्या विळख्यातून मुक्त करून निरोगी, सशक्त आणि व्यसनमुक्त समाजाची निर्मिती करण्याच्या उद्देशाने दोडामार्ग येथे उद्या ‘नशामुक्त युवा’ जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोकण कला व शिक्षण विकास संस्था, सिंधुदुर्ग, मेरा युवा भारत आणि दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे 25 नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत हा कार्यक्रम पार पडणार आहे. सध्याच्या काळात तरुणांमध्ये वाढत असलेली व्यसनाधीनता ही चिंतेची बाब ठरत आहे. व्यसनांचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम लक्षात घेता तरुणाईमध्ये योग्य वेळी जनजागृती होणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर तरुणांना व्यसनांपासून दूर राहण्याचा संदेश देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
युवा पिढी ही देशाच्या भविष्याची खरी ताकद आहे. या शक्तीचा उपयोग विधायक कार्यासाठी व्हावा, तरुणांमध्ये सकारात्मक विचारांची रुजवण व्हावी आणि व्यसनमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करण्याची प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.
या जनजागृती कार्यक्रमाला शिक्षणप्रेमी, समाजसुधारक, माजी विद्यार्थी तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि व्यसनमुक्त समाजनिर्मितीच्या चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
व्यसनमुक्त तरुणाईसाठी दोडामार्गात ‘नशामुक्त युवा’ उपक्रम