महाराष्ट्रात ११ महिन्यांत ११ लाखांहून अधिक रुग्णांना मोफत उपचार; आयुष्मान व महात्मा फुले योजनेतून २,८६९ कोटींचा खर्च

0
10
महाराष्ट्रात ११ महिन्यांत ११ लाखांहून अधिक रुग्णांना मोफत उपचार
महाराष्ट्रात ११ महिन्यांत ११ लाखांहून अधिक रुग्णांना मोफत उपचार

महाराष्ट्रात ११ महिन्यांत ११ लाखांहून अधिक रुग्णांना मोफत उपचार; आयुष्मान व महात्मा फुले योजनेतून २,८६९ कोटींचा खर्च

आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून १७ लाखांहून अधिक उपचार; शासनाचा २,८६९ कोटींचा खर्च

मुंबई :
आयुष्मान भारत–प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या एकत्रित अंमलबजावणीमुळे राज्यातील प्रत्येक कुटुंबाला प्रतिवर्ष पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार उपलब्ध झाले आहेत. जानेवारी ते नोव्हेंबर २०२६ या कालावधीत राज्यातील ११ लाखांहून अधिक रुग्णांनी १७ लाखांहून अधिक उपचारांचा लाभ घेतला असून, त्यासाठी शासनाने २ हजार ८६९ कोटी रुपये खर्च केले आहेत.
राज्यातील सर्व अधिवासी कुटुंबांना आरोग्य संरक्षण देण्याच्या उद्देशाने या योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये कर्करोग, हृदयरोग, मूत्रपिंडाचे विकार, अवयव प्रत्यारोपण, अपघात तसेच अन्य गंभीर आजारांवरील उपचारांचा समावेश आहे. एकूण २ हजार ३९९ उपचार व शस्त्रक्रिया पद्धतींचा लाभ पात्र रुग्णांना घेता येतो.
राज्यातील पाच हजारांहून अधिक शासकीय आणि खासगी अंगीकृत रुग्णालयांमध्ये पात्र लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत मोफत उपचार मिळतात. याशिवाय ७० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘आयुष्मान वय वंदना’ योजनेंतर्गत अतिरिक्त पाच लाख रुपयांचे आरोग्य संरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे.
राज्यात आजअखेर ४ कोटी ४५ लाख आयुष्मान कार्डे, तर १२ लाख २० हजार ज्येष्ठ नागरिकांची आयुष्मान वय वंदना कार्डे तयार करण्यात आली आहेत.
पात्र लाभार्थ्यांनी अद्ययावत शिधापत्रिका, आधार क्रमांक आणि आधारशी संलग्न मोबाईल क्रमांकाच्या आधारे आपले आयुष्मान कार्ड तयार करून घ्यावे. यासाठी आशा कर्मचारी, आपले सरकार सेवा केंद्र, स्वस्त धान्य दुकाने किंवा आयुष्मान ॲपची मदत घेता येणार आहे.
योजनांसंदर्भातील अधिक माहिती किंवा तक्रारींसाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या १५५३८८ किंवा १८००२३३२२०० या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा. तसेच आयुष्मान भारत योजनेसाठी १४५५५ किंवा १८००१११५६५ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here