संविधान दिनानिमित्त किल्ले सुवर्णदुर्ग व गोवा भुईकोट किल्ल्यावर स्वच्छता मोहीम; उद्या विशेष कार्यक्रम
किल्ले सुवर्णदुर्ग व गोवा भुईकोट किल्ल्यावर उद्या संविधान दिन; स्वच्छता मोहिमेचे आयोजन
रत्नागिरी :
ऐतिहासिक गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि भारतीय संविधानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी किल्ले सुवर्णदुर्ग आणि गोवा भुईकोट किल्ला येथे संविधान दिनानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, सामाजिक न्याय विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग आणि पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमाची सुरुवात सकाळी ७.३० वाजता किल्ले सुवर्णदुर्ग येथे स्वच्छता मोहिमेने होणार आहे. ही मोहीम सकाळी ९ वाजेपर्यंत चालणार आहे. त्यानंतर सकाळी ९.३० ते दुपारी १२ या वेळेत गोवा भुईकोट किल्ला येथे मुख्य संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
ऐतिहासिक वारशाचे जतन, स्वच्छतेचे महत्त्व आणि संविधानातील मूल्यांविषयी जनजागृती करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात सहभागी होऊन ऐतिहासिक वारसा जपण्याच्या कार्यात नागरिकांनी योगदान द्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.