नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाची घळभरणी लवकरच; पालकमंत्री नितेश राणे यांची मंत्रालयात बैठक
नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या घळभरणीचा मार्ग मोकळा; कामाला गती देण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश
मुंबई :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या दालनात विशेष बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत प्रकल्पाची घळभरणी लवकरच करण्याचे निश्चित करण्यात आले.
प्रकल्पाच्या कामातील अडथळे दूर करून उर्वरित कामांना गती द्यावी, तसेच प्रकल्पग्रस्तांना नियमानुसार नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. प्रकल्पाच्या पुनर्वसनस्थळी आवश्यक असलेल्या १८ नागरी सुविधा निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
या बैठकीला सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला. तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव जयंत बोरकर, ऊर्जा विभागाचे अपर मुख्य सचिव नारायण कराड, ग्रामविकास विभागाच्या सचिव कविता पोद्दार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
नरडवे प्रकल्पाची घळभरणी लवकरच करण्याचे निश्चित झाल्याने प्रकल्पाच्या पुढील कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.