तिथवलीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शाखेचे उद्घाटन; पुन्हा शिवसेना उभारण्याचा वैभव नाईक यांचा विश्वास

0
7
तिथवलीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शाखेचे उद्घाटन
तिथवलीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शाखेचे उद्घाटन

तिथवलीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शाखेचे उद्घाटन; पुन्हा शिवसेना उभारण्याचा वैभव नाईक यांचा विश्वास

तिथवली :
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वैभववाडी तालुक्यातील तिथवली शाखेचा उद्घाटन सोहळा सोमवारी उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला शिवसैनिक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रतिकूल परिस्थितीतही शिवसैनिक जोमाने काम करून पुन्हा शिवसेना उभी करतील. त्याची सुरुवात तिथवली शाखेपासून झाली आहे, असा विश्वास कुडाळ-मालवणचे माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी व्यक्त केला.
तिथवली शाखेच्या उद्घाटनाला मिळालेला प्रतिसाद हा केवळ एका गावापुरता मर्यादित नसून सर्व शिवसैनिकांना ऊर्जा देणारा आहे. शिवसेना हा संघर्ष करणारा पक्ष आहे. या शाखेच्या माध्यमातून गावातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही वैभव नाईक यांनी सांगितले.
या उद्घाटन सोहळ्याला शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत, उपनेते अरुण दूधवडकर, माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, सिंधुदुर्ग लोकसभा संपर्कप्रमुख प्रदीप बोरकर, कणकवली विधानसभा प्रमुख तथा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, रत्नागिरी जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, धारावी विधानसभा प्रमुख वसंत नकाशे, मुंबईचे नगरसेवक किरण तावडे आणि रत्नागिरी उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना वैभव नाईक यांनी सुशांत नाईक यांच्या कार्याचे कौतुक केले. अनेक सहकारी सोडून गेले असतानाही सुशांत नाईक हे कणकवली विधानसभा मतदारसंघात जबाबदारीने काम करत आहेत. नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत, असे त्यांनी नमूद केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जमिनी परप्रांतीयांना विकल्या जात असल्याचा आरोप करत त्याला विरोध करण्याची गरज असल्याचे वैभव नाईक यांनी सांगितले. जिल्ह्याचे अस्तित्व आणि हित जपण्यासाठी शिवसैनिकांनी या मातीत घट्ट पाय रोवून काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चिपी विमानतळ आणि महिला व बाल रुग्णालय उभारण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी केला. तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शेतकरी व मच्छीमारांना नुकसानभरपाई देण्यासारखी लोकहिताची कामे करण्यात आल्याचे ते म्हणाले.
सध्याच्या सत्ताधाऱ्यांवर टीका करताना त्यांनी अदानीचे स्मार्ट मीटर बसविणे, जिल्ह्यात विनाशकारी प्रकल्प आणणे, भातशेतीच्या नुकसानीची भरपाई अद्याप न मिळणे यांसारखे मुद्दे उपस्थित केले. पालकमंत्र्यांकडून दुष्काळ जाहीर करण्याबाबत प्रसिद्धी केली जात असली, तरी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही, असा आरोप त्यांनी केला.
चिपी विमानतळावरील विमानसेवा तीन वेळा बंद पडल्याचा तसेच रो-रो बोट सेवा सुरू झाल्यानंतर पहिल्याच महिन्यात बंद पडल्याचा उल्लेख करत या उपक्रमांबाबत केवळ प्रसिद्धी केली जात असल्याची टीका त्यांनी केली. वैभववाडीत साखर कारखाना सुरू करण्याची घोषणा दहा वर्षांपूर्वी करण्यात आली होती; मात्र अद्याप कारखान्याचा साधा फलकही लागलेला नाही, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण रावराणे, वैभववाडी तालुकाप्रमुख नंदू शिंदे, तालुका संपर्कप्रमुख विठ्ठल बंड, युवासेना तालुकाप्रमुख रोहित पावसकर, उत्तम लोके, राजापूर विधानसभा प्रमुख तात्या सरवणकर, राजापूर तालुकाप्रमुख कमलाकर कदम, सहसंपर्कप्रमुख पंढरीनाथ तावडे, वसंत खानविलकर, गुलजार काझी, बाबा मोरे, दिव्या पाचकुडे, लक्ष्मीप्रभा जाधव, जावेद पाटणकर, संतोष पाटील, जितेंद्र तळेकर, तिथवली शाखाप्रमुख चिंतामण जैतापाकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here