इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम २०२७ पर्यंत पूर्ण करा; दिरंगाई खपवून घेणार नाही – मुख्यमंत्री फडणवीस

0
7
इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम २०२७ पर्यंत पूर्ण करा; दिरंगाई खपवून घेणार नाही – मुख्यमंत्री फडणवीस
इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम २०२७ पर्यंत पूर्ण करा; दिरंगाई खपवून घेणार नाही – मुख्यमंत्री फडणवीस

इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम २०२७ पर्यंत पूर्ण करा; दिरंगाई खपवून घेणार नाही – मुख्यमंत्री फडणवीस

स्मारकाच्या प्रगतीचा सह्याद्री अतिथीगृहात आढावा; एमएमआरडीएला दररोज कामावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश

मुंबई :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे उर्वरित काम वेगाने पूर्ण करून हे स्मारक २०२७ पर्यंत पूर्ण करावे. या कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली स्मारकाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत प्रकल्पाची सद्यस्थिती, स्ट्रक्चरल स्टीलचे फॅब्रिकेशन, ब्रॉन्झ क्लॅडिंग, बांधकामाची गुणवत्ता, कंत्राटदाराकडून करण्यात आलेल्या अतिरिक्त आर्थिक मागण्या आणि काम पूर्ण करण्याची कालमर्यादा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. स्मारकाचे काम अपेक्षित गतीने पूर्ण होत नसल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली.
कंत्राटातील अटी व शर्तींचे पालन करून निर्धारित वेळेत काम पूर्ण करणे ही संबंधित कंत्राटदाराची जबाबदारी आहे. आर्थिक मागण्यांचे कारण देऊन काम थांबविणे योग्य नाही. कंत्राटदाराने सुधारित कामाचे वेळापत्रक तयार करून ते उच्चाधिकार समितीकडे सादर करावे. तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) कामाच्या प्रगतीवर दररोज नियंत्रण ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
दिरंगाई झाल्यास पर्यायी एजन्सीचा विचार
संबंधित एजन्सीची काम पूर्ण करण्याची क्षमता आणि बांधिलकी तपासण्यात यावी. आवश्यकतेनुसार पर्यायी एजन्सी नियुक्त करण्यासह कठोर कारवाईच्या पर्यायांचाही विचार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. कंत्राटदाराच्या आर्थिक दाव्यांची तांत्रिक व आर्थिक छाननी करून नियमानुसार निर्णय घेण्यात यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कंत्राटातील तरतुदी, जीएसटी दरातील बदल, दरवाढ निर्देशांक आणि अतिरिक्त कामांमुळे निर्माण झालेल्या खर्चाची पडताळणी करावी. जीएसटी दरातील बदलाबाबत कंत्राटातील तरतुदींनुसार कायदेशीर अभिप्राय घ्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ब्रॉन्झ क्लॅडिंगसाठी आवश्यक साहित्य खरेदी करता यावे, यासाठी बँक हमीच्या आधारे आगाऊ रक्कम देण्याच्या प्रस्तावाची तपासणी करावी. सर्व आर्थिक प्रस्ताव एकत्रितपणे समितीसमोर ठेवून नियमानुसार निर्णय घ्यावा, असेही त्यांनी निर्देशित केले.
स्ट्रक्चरल स्टील आणि ब्रॉन्झ क्लॅडिंगची कामे समांतरपणे पूर्ण करा
स्ट्रक्चरल स्टीलची उभारणी आणि ब्रॉन्झ क्लॅडिंगची कामे परस्पर समन्वयाने समांतरपणे पूर्ण करावीत. आवश्यक साहित्य, यंत्रसामग्री, मनुष्यबळ, फॅब्रिकेशन आणि प्रत्यक्ष बांधकाम यांचा समावेश असलेले सुधारित वेळापत्रक तयार करावे. प्रत्येक कामाची जबाबदारी आणि कालमर्यादा निश्चित करून नियमित आढावा घ्यावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
स्मारकाच्या संरचनात्मक रचनेची गुणवत्ता, सुरक्षितता आणि स्थैर्य याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. संबंधित एजन्सीची जबाबदारी कायम ठेवून कामाची गती वाढवावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक हा महत्त्वाचा सार्वजनिक प्रकल्प असल्याने निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
या बैठकीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार राम कदम, आमदार संजय बनसोडे तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here