हळवलवर शोककळा; चित्रकार सूरज राणे यांचे वयाच्या २७ व्या वर्षी दुर्दैवी निधन
हळवलवर शोककळा; चित्रकार सूरज राणे यांचे वयाच्या २७ व्या वर्षी दुर्दैवी निधन
कणकवली :
हळवल मधलीवाडी येथील रहिवासी आणि नामांकित चित्रकार सूरज अविनाश राणे (वय २७) यांचे राहत्या घरावरून पडल्याने दुर्दैवी निधन झाले. ही घटना सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली. त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे हळवलसह संपूर्ण पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.
सूरज राणे हे उत्कृष्ट चित्रकार म्हणून परिचित होते. विशेषतः हुबेहूब रांगोळी साकारण्याच्या त्यांच्या कौशल्यामुळे त्यांनी परिसरात वेगळी ओळख निर्माण केली होती. ते भारतीय डाक विभागाच्या बोर्डवे येथील कार्यालयात कार्यरत होते. तसेच त्यांनी हळवल ग्रामपंचायतीचे माजी सदस्य म्हणूनही काम पाहिले होते.
सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात परिचित असलेल्या सूरज यांच्या अकाली निधनाने मित्रपरिवार, ग्रामस्थ आणि कलाप्रेमींमधून हळहळ व्यक्त होत आहे. ते हळवलचे माजी तंटामुक्ती समिती सदस्य अविनाश राणे यांचे पुत्र होत.
त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, काका-काकी असा परिवार आहे. हळवल येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.