तळकोकणातील लोककलाविष्काराने कणकवलीत रंगली देवदिवाळीची सांस्कृतिक मेजवानी!
३० कलाकारांच्या सहभागातून दशावतार कलेचे बहारदार सादरीकरण; आमदार प्रमोद जठार यांच्याकडून कलाकारांचे कौतुक
कणकवली :
देवदिवाळीचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘दिवाळी ईली फराळाक येवा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम कणकवली येथील आचरेकर प्रतिष्ठान येथे उत्साहात संपन्न झाला. तळकोकणातील समृद्ध लोककला आणि सांस्कृतिक परंपरेचा देखणा आविष्कार या कार्यक्रमातून रसिकांना अनुभवायला मिळाला.

कोकणच्या मातीत रुजलेली आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घालणारी दशावतार लोककला या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरली. तब्बल ३० कलाकारांनी आपल्या अभिनयातून, प्रभावी संवादफेकीतून आणि पारंपरिक कलाविष्कारातून दशावतार कलेचे बहारदार सादरीकरण केले. कलाकारांच्या उत्कृष्ट सादरीकरणाला रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण कार्यक्रमातून कोकणच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडले.



