महाराष्ट्र फाउंडेशनचे साहित्य व समाजकार्य पुरस्कार २०२७ ; ९ व १० जानेवारीला पुण्यात भव्य सांगता सोहळा!
महाराष्ट्र फाउंडेशनचे साहित्य व समाजकार्य पुरस्कार २०२७ ; ९ व १० जानेवारीला पुण्यात भव्य सांगता सोहळा!
३२ वर्षांची साहित्य पुरस्कारांची आणि ३० वर्षांची समाजकार्य पुरस्कारांची परंपरा थांबणार;
न्यायमूर्ती ए. पी. शहा आणि गोव्याचे ज्येष्ठ साहित्यिक दामोदर मावजो यांची प्रमुख उपस्थिती
पुणे :
अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी बांधवांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) या संस्थेच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित साहित्य आणि समाजकार्य पुरस्कारांची परंपरा २०२७ मध्ये संपुष्टात येणार आहे. २०२७ हे या पुरस्कारांचे अंतिम वर्ष असून, ३२ वर्षांची साहित्य पुरस्कारांची आणि ३० वर्षांची समाजकार्य पुरस्कारांची समृद्ध परंपरा यानिमित्ताने थांबणार आहे. या पुरस्कारांचा भव्य सांगता सोहळा ९ आणि १० जानेवारी २०२७ रोजी पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. या वर्षीच्या साहित्य, समाजकार्य आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कारांची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली.
या पुरस्कारांचे प्रवर्तक सुनील देशमुख यांचे चार वर्षांपूर्वी दुःखद निधन झाले. महाराष्ट्र फाउंडेशनचे पुरस्कार आणि सुनील देशमुख यांचे अतूट नाते लक्षात घेऊन गेल्या तीन वर्षांपासून सर्व पुरस्कारांना ‘सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशन साहित्य आणि समाजकार्य पुरस्कार’ असे संबोधले जात आहे. साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करणाऱ्या या पुरस्कारांनी गेल्या तीन दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या वैचारिक, साहित्यिक आणि सामाजिक चळवळींना महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
२०२६ या वर्षासाठी साहित्य क्षेत्रातील पाच, समाजकार्य क्षेत्रातील पाच आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार असे एकूण ११ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मासूम संस्थेच्या संयोजक डॉ. मनीषा गुप्ते आणि डॉ. रमेश अवस्थी, साधना ट्रस्टचे संपादक विनोद शिरसाठ (समाजकार्य पुरस्कार) आणि साहित्य पुरस्कार समन्वयक मुकुंद टाकसाळे यांनी पुरस्कारांची घोषणा केली.
मासूम संस्था आणि साधना ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा दोन दिवसीय पुरस्कार सोहळा एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन, पुणे येथे पार पडणार आहे. ९ जानेवारी २०२७ रोजी समाजकार्य पुरस्कार वितरण सोहळा आणि सांगता कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून न्यायमूर्ती ए. पी. शहा उपस्थित राहणार आहेत. तर १० जानेवारी रोजी साहित्य पुरस्कार वितरण सोहळा आणि सांगता समारंभ होणार असून, गोव्याचे ज्येष्ठ साहित्यिक दामोदर मावजो प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
दोन्ही दिवशी सायंकाळी ५ ते ७.३० या वेळेत कार्यक्रम होणार आहेत. साहित्य आणि समाजकार्य क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याला यंदा विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. तीन दशकांहून अधिक काळ सुरू असलेल्या या पुरस्कार परंपरेचा निरोप घेण्यासाठी साहित्यप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र फाउंडेशनशी जोडलेले मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
— डॉ. मनीषा गुप्ते
सह-समन्वयक, मासूम
महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार संयोजन समिती